नवी दिल्ली ः प्रत्येक महिलांच्या आरोग्याच्या गरजा या वेगवेगळ्या असतात. त्यांना अधिक पोषण आणि शक्तीची आवश्यकता असते. त्यातच सध्या कुटुंब आणि कामाच्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये, महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता सामान्य झाली आहे. पोषणाच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलनदेखील होते. तज्ज्ञांचा असाही विश्वास आहे की, महिलांनी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यापैकी एक धान्य म्हणजे नाचणी. नाचणी हे धान्य असे आहे, जे प्रत्येक महिलांसाठी सर्वोत्तम मानले जाते.
पोषणतज्ज्ञांच्या मते, महिलांनी नाचणीचे सेवन करावे. कारण नाचणी ही पौष्टिकतेने समृद्ध आहे आणि महिलांच्या शारीरिक समस्यांसाठी फायदेशीर आहे. नाचणी शरीराला शक्ती प्रदान करते, हाडे मजबूत करते आणि अशक्तपणा कमी करण्यास देखील मदत करते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने ते हाडे मजबूत करण्यास मदत करते. महिलांचे वय वाढत असताना हाडांची घनता कमी होते. म्हणूनच हाडे मजबूत राखण्यासाठी आणि हाडांची घनता सुधारण्यासाठी नाचणी हा एक उत्तम पर्याय आहे. लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत म्हणजे नाचणी आहे. पोषणतज्ज्ञांच्या मते, त्यात पालकापेक्षा जास्त लोह असते, जे अशक्तपणाशी लढण्यास मदत करते आणि आळस व थकवा कमी करण्यास देखील मदत करते. नाचणीमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनासाठी फायदेशीर असते. नाचणी बद्धकोष्ठता आणि गॅसपासून आराम देते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करते. नाचणीपासून तयार पदार्थ खाल्ल्याने आपले जास्त काळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. ज्यांना ग्लूटेनची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी देखील नाचणी हे आदर्श आहे. कारण ती ग्लूटेन-मुक्त आहे आणि मधुमेही लोकंसुद्धा आरामात नाचणीपासून तयार पदार्थांचे सेवन करू शकतात.