मेक्सिको : अनेकदा लोक जेवणानंतर लगेच झोपणे किंवा बसणे पसंत करतात. अशा अनेक दुर्लक्षामुळे नवनवीन आजार निर्माण होत आहेत. खरं तर, जेवल्यानंतर लगेच झोपून राहणं किंवा बराच वेळ एकाच जागी बसून राहणं अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतं. जे लोक रात्री जेवल्यानंतर लगेच झोपतात, त्यांचे वजन वाढत राहते, ज्यामुळे शरीराभोवती जडपणा किंवा सूज येणे अशा अनेक समस्या उद्भवू लागतात.
एखाद्या व्यक्तीच्या जीवनशैलीतील छोटे-छोटे बदलही त्याच्या आरोग्याला मोठा फायदा देऊ शकतात. डॉक्टरांच्या मते, रात्रीच्या जेवणानंतर चालण्याची सवय आपल्या दिनक्रमाचा भाग बनवा. काही पावले टाकली, तरी अन्न खाल्ल्यानंतर चालल्याने वजन टिकून राहते आणि अनेक गंभीर आजारांवर मात करता येते.
रात्री जेवल्यानंतर चालण्याच्या सवयीमुळे पचनक्रिया वेगवान होते आणि तुमची पचनसंस्था सक्रिय होते. त्याचबरोबर लहान आतड्यापर्यंत अन्न चांगल्या प्रकारे पोहोचण्यास मदत होते. जेवल्यानंतर चालल्याने पोटात तयार होणार्या अॅसिडिटीची समस्या कमी होते. आजकाल खराब जीवनशैलीमुळे लोक अनेक तास अंथरुणावर पडून राहतात, तरीही त्यांना शांत झोप मिळत नाही. पचनक्रिया चांगली असेल, तर घबराट आणि अस्वस्थता येत नाही. त्यामुळे नाईट वॉकमुळे चांगली झोप येऊ शकते.
रात्रीच्या जेवणानंतर चालणे शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त ठेवते आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते. चालण्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि वजन कमी होण्यास बरीच मदत होते. वजन कमी करण्याबरोबरच नियमित चालण्याने शरीराचे चयापचयदेखील वाढते, ज्यामुळे आपल्या शरीरात अधिक कॅलरी बर्न होतील. चालण्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो. हे उच्च रक्तदाबाची पातळी कमी करण्यास मदत करते आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळीदेखील नियंत्रित ठेवते. रात्री जेवल्यानंतर 30 मिनिटांनी चालायला सुरुवात करा आणि फार वेगवान किंवा स्लो मोशनमध्ये नाही, तर 20 मिनिटे ते अर्धा तास नॉर्मल वॉक करणे आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते, असेही जाणकारांचे मत आहे.