नवी दिल्ली : उन्हाळा सुरू होताच तीव्र ऊन आणि वाढते तापमान आरोग्यावर परिणाम करू लागते. अशा वेळी लोक शरीराला थंड ठेवण्यास मदत करणारे पदार्थ शोधतात. सामान्यतः असा समज आहे की, उन्हाळ्यात कच्चा कांदा हीट स्ट्रोकपासून बचाव करतो आणि शरीराला थंडावा देतो. चला, जाणून घेऊया की ग्रीष्म ऋतूमध्ये कच्चा कांदा नियमित खाल्ल्यास तुम्हाला काय-काय फायदे मिळतात :
मेट्रोपॉलिस इंडिया या आरोग्यविषयक माहिती देणार्या संस्थेच्या अहवालानुसार, कच्चा कांदा अनेक आवश्यक पोषक तत्त्वांनी युक्त असतो. त्यात व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. कारण, ते कोलेजन तयार होण्याच्या प्रक्रियेत मदत करते. याशिवाय त्यात फोलेट असते, जे पेशींच्या निर्मिती आणि डीएनए विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. कांद्यात पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते, जे मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टम)च्या कार्यासाठी आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच, त्यातील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. कांद्यात क्वेरसेटिनसारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंटस् असतात, जे सूज कमी करतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
कच्च्या कांद्यात पाण्याचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. हे शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन राखते आणि डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) टाळण्यास मदत करते. याशिवाय कच्चा कांदा त्याच्या ‘कूलिंग इफेक्ट’ साठी ओळखला जातो. त्याचे सेवन केल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. हे घाम येण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देते, ज्यामुळे शरीर नैसर्गिकरीत्या थंड राहते. म्हणूनच उन्हाळ्यात सलाडमध्ये किंवा जेवणासोबत साईड डिश म्हणून कच्चा कांदा खाणे फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात कच्चा कांदा नियमित खाल्ल्यास शरीर थंड राहते, हायड्रेशन टिकते, इम्युनिटी वाढते, पचन सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे ग्रीष्म ऋतूत रोजच्या आहारात कच्चा कांदा (सलाड, चटणी किंवा साईड डिश म्हणून) समाविष्ट करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.