नवी दिल्ली : सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे, जे त्याच्या चव आणि आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. साधारणपणे गोड फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य मानली जात नाहीत. परंतु, या फळात असे काही गुणधर्म आहेत, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. या फळात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायबरचे सेवन विशेषतः महत्त्वाचे आहे. कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. फायबर हळूहळू साखर शोषून घेण्याची प्रक्रिया नियंत्रित करते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो.
या फळात विटामिन सी मुबलक प्रमाणात असते, हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंटस् आहे. अँटिऑक्सिडंटस् शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात, जे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सामान्यत: जास्त असतात. या मुक्त रॅडिकल्समुळे शरीरातील पेशींचा दाह आणि नाश होऊ शकतो. त्यामुळे सीताफळाच्या सेवनाने शरीराला संरक्षण मिळते आणि शारीरिक नुकसान कमी होते. या फळात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी महत्त्वपूर्ण खनिजे असतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मधुमेहाच्या रुग्णांना हृदयाच्या समस्यांचा धोका जास्त असतो आणि या खनिजांच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोका कमी होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांचे वजन नियंत्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जास्त वजन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते. या फळात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे पोट भरल्याची भावना येते. ते आतड्यांमध्ये वेगाने शोषले जाते आणि पोट बराच काळ भरलेले वाटते, ज्यामुळे जास्त खाण्याची शक्यता कमी होते. यामुळे वजन कमी होण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. सीताफळात आढळणारे हेल्दी फॅटस् (फॅटी अॅसिड) कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांना उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो आणि सीताफळ खाल्ल्याने या समस्या कमी होऊ शकतात. अर्थात, मधुमेहाच्या रुग्णांनी मर्यादेतच त्याचे सेवन करणे हितावह ठरते.