विश्वसंचार

Beluga whale : बेलुगा व्हेल संवाद साधण्यासाठी बदलतात चक्क डोक्याचा आकार!

Arun Patil

न्यूयॉर्क : एकमेकांशी संवाद साधण्यासाठी माणसाला भाषेची देणगी मिळालेली आहे. जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात व त्या माध्यमातून माणूस एकमेकांशी संवाद साधत असतो. पशुपक्ष्यांमध्येही संवादाची स्वतःची पद्धत असते. बेलुगा व्हेलमधील संवादाची पद्धत तर थक्क करणारीच असल्याचे दिसून आले आहे. हे मासे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपल्या डोक्याचा आकारही बदलतात.

बेलुगा व्हेल ही तोंडात दात असलेली एकमेव व्हेल प्रजाती आहे. या प्रजातीमधील मासे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तसेच संवाद साधण्यासाठी डोक्याचा आकार बदलतात, असे एका नव्या संशोधनात दिसून आले. त्यांचे वर्तन नेहमीच संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय बनलेले आहे. अनेक सस्तन प्राणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी चेहर्‍यावरील हावभावांचाही वापर करीत असतात. मात्र सागरी जलचर हे भावना चेहर्‍यावर दर्शवू शकत नाहीत. अर्थात, त्यांच्या चेहर्‍यातही स्नायू असले तरी त्यांची त्वचा ही अतिशय घट्ट व रबरी असते. त्या तुलनेत एप वानरे, कुत्रा, डुक्कर व अन्य अनेक प्राणी त्यांच्या चेहर्‍यावरील लवचीक त्वचेचा व स्नायूंचा वापर करून आपल्या भावना दर्शवू शकतात.

बेलुगा व्हेलमध्ये अशी क्षमता नसली तरी ते चक्क डोक्याचा आकार बदलून आपल्या भावना दर्शवतात, असे दिसून आले आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती जर्नल अ‍ॅनिमल कॉग्निशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, संवाद साधण्यासाठी हे मासे आपल्या डोक्यावरील फुगीर भागाचा आकार बदलतात. हा भाग फॅटी टिश्यू म्हणजेच चरबीयुक्त ऊतींनी बनलेला असतो. याच भागाच्या साहाय्याने व्हेल मासे श्रवण करण्याजोग्या सिग्नल्सना तीव्र करतात. हे सिग्नल्स त्यांच्या संवादाचे एक माध्यम असते. मात्र ते केवळ श्रवणातूनच नव्हे, तर द़ृश्यातूनही संवाद साधतात, असे आता दिसले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT