Moon day cycle health | चंद्रावर ‘मॉर्निंग पर्सन’ असणे आरोग्यासाठी ठरणार फायदेशीर 
विश्वसंचार

Moon day cycle health | चंद्रावर ‘मॉर्निंग पर्सन’ असणे आरोग्यासाठी ठरणार फायदेशीर

शास्त्रज्ञांना सापडला कमी रेडिएशनचा पट्टा!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पृथ्वीवर सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आपण ऐकले आहेत; पण आता शास्त्रज्ञांनी एक असा शोध लावला आहे, जो चंद्रावर जाणार्‍या अंतराळवीरांसाठी ‘सकाळची वेळ’ जीवनदायी ठरू शकते असे सुचवतो. चंद्राच्या जवळ वैज्ञानिकांना अवकाशातील घातक ‘कॉस्मिक रेडिएशन’ (वैश्विक किरणोत्सर्ग) कमी असलेला एक पट्टा किंवा ‘पोकळी’ सापडली आहे. या शोधामुळे भविष्यातील चंद्र मोहिमांदरम्यान अंतराळवीरांचे संरक्षण करणे सोपे होणार आहे.

चीनच्या ‘चांग-ई 4’ लँडरकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, चंद्रावर सूर्योदयानंतरच्या काही तासांत (स्थानिक सकाळच्या वेळी) ‘गॅलेक्टिक कॉस्मिक रे’चे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असते. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा समज होता की, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या बाहेर चंद्रापर्यंतच्या अंतरात हे किरण सर्वत्र सारख्याच प्रमाणात पसरलेले असतात.

मात्र, या नवीन शोधामुळे हे स्पष्ट झाले आहे की, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र अपेक्षेपेक्षा जास्त दूरपर्यंत अंतराळात परिणाम करते. अंतराळात प्रवास करताना अंतराळवीरांना सर्वात मोठा धोका हा कॉस्मिक रेडिएशनचा असतो. हे उच्च-ऊर्जा कण मानवी शरीरातील पेशी आणि ‘डीएनए’ला हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. जर्मनीतील कील विद्यापीठाचे प्राध्यापक रॉबर्ट विमर-श्विनग्रुबर यांच्या मते, चंद्रावरील सकाळच्या वेळी फिरल्यास अंतराळवीरांच्या त्वचेवर पडणार्‍या रेडिएशनचे प्रमाण सरासरीपेक्षा 20 टक्के कमी असते.

‘नासा’ची ‘आर्टेमिस खख’ ही मोहीम लवकरच लाँच होणार आहे. अशा वेळी रेडिएशनचा हा नकाशा मिशन प्लॅनर्सना अंतराळवीरांच्या चंद्रभ्रमंतीची वेळ ठरवण्यासाठी मोलाची मदत करेल. संशोधकांनी जानेवारी 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीतील एकूण 31 चंद्र चक्रांचा अभ्यास केला. ‘चांग-ई 4’ वरील उपकरणांनी मोजलेल्या प्रोटॉन कणांच्या संख्येवरून असे दिसून आले की, चंद्राच्या ‘वॅक्सिंग गिब्बस’ (शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंतची स्थिती) टप्प्यात कमी ऊर्जेच्या प्रोटॉन्समध्ये 20 टक्क्यांनी घट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT