New Zealand parrot |चोच नसतानाही न्यूझीलंडचा पोपट बनला ‘अल्फा मेल’ 
विश्वसंचार

New Zealand parrot |चोच नसतानाही न्यूझीलंडचा पोपट बनला ‘अल्फा मेल’

पुढारी वृत्तसेवा

ख्राइस्टचर्च : वरची चोच पूर्णपणे नसतानाही केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर न्यूझीलंडमधील एका पोपटाने आपल्या समूहात सर्वोच्च स्थान (Alpha Male Status) पटकावले आहे. ‘बू्रस’ नावाच्या या ‘किया’ (Kea) जातीच्या पोपटाने स्वतःच्या शारीरिक कमतरतेचे रूपांतर एका अनोख्या युद्धतंत्रात केले असून, यावर आधारित एक नवीन संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कँटरबरीचे जीवशास्त्रज्ञ अ‍ॅलेक्स ग्रॅबहॅम यांच्या संशोधनानुसार, ब्रूसने ‘जौस्टिंग’ (द्वंद्वयुद्ध) करण्याची एक वेगळीच पद्धत विकसित केली आहे. त्याची वरची चोच नसल्यामुळे तो फक्त खालच्या चोचीचा वापर करून प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यावर, पंखांवर आणि पायांवर वार करतो. ब्रूस अनेकदा प्रतिस्पर्ध्याला प्रत्यक्ष इजा न करता केवळ घाबरवण्यासाठी या हालचाली करतो. तो आपली मान लांब करून जवळून पूर्ण ताकदीने वार करतो किंवा दुरून पळत येऊन आणि उडी मारून समोरच्या नर पोपटावर तुटून पडतो. ही हालचाल इतकी प्रभावी आहे की, 73 टक्के वेळा प्रतिस्पर्धी पोपट त्याला पाहताच पळून जातात. निरीक्षणादरम्यान झालेल्या सर्व 36 लढायांमध्ये ब्रूसने विजय मिळवला आहे.

साधारण 12 वर्षांपूर्वी न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील पर्वतांमध्ये ब्रूस सापडला होता. तेव्हा तो लहान होता आणि त्याची वरची चोच अपघातामुळे तुटलेली होती. ‘किया’ पोपट हे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात; पण एका शारीरिक कमतरता असलेल्या जीवाने स्वतःच्या बळावर समूहाचे नेतृत्व मिळवण्याची ही जगातील पहिलीच नोंद असावी, असे संशोधकांचे म्हणणे आहे. चोच नसल्यामुळे स्वतःची पिसे साफ करण्यासाठी तो वेगवेगळ्या आकाराच्या गारगोट्यांचा वापर करतो. ‘किया’ पोपटांमध्ये स्वतःची काळजी घेण्यासाठी साधनांचा वापर करण्याचे हे पहिलेच रेकॉर्ड केलेले उदाहरण आहे. संशोधक सांगतात की, बू्रसचे हे तंत्र इतर पोपट कॉपी करू शकत नाहीत. कारण, त्यांची वरची चोच आडवी येते. ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT