मोहाली : देशातील वैज्ञानिकांनी एक असे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे भविष्यात बॅटरीशिवाय चालणारे सेन्सर्स आणि अंगावर परिधान करता येणारे (वेअरेबल) स्मार्ट गॅजेटस् बनवणे शक्य होणार आहे. मोहाली येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी’च्या वैज्ञानिकांनी एक अत्यंत पातळ आणि लवचिक फिल्म (अल्ट्रा-थिन फिल्म) तयार केली आहे, जी तापमानातील अगदी किरकोळ बदलातूनही वीज निर्माण करू शकते. हे तंत्रज्ञान हेल्थ मॉनिटरिंग, पर्यावरण मॉनिटरिंग आणि ऊर्जा बचत करणार्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठी भूमिका बजावू शकते.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत काम करणार्या या संस्थेत हे संशोधन करण्यात आले. या संशोधन दलाचे नेतृत्व प्राध्यापक दीपांकर मंडल यांनी केले. त्यांच्यासोबत वैज्ञानिक सुदीप नस्कर आणि इतर संशोधकांनी मिळून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्रा. दीपांकर यांनी सांगितले की, ‘आमच्या टीमने ‘पीव्हीडीएफ’ नावाच्या एका विशेष लवचिक पॉलिमरमध्ये अत्यंत कमी प्रमाणात ‘नॅनो गोल्ड’ म्हणजेच सोन्याचे सूक्ष्म कण मिसळले. यानंतर एक अल्ट्रा-थिन फिल्म तयार करण्यात आली, ज्याची जाडी 100 नॅनोमीटरपेक्षाही कमी आहे. यामुळे या फिल्मची पायरॉइलेक्ट्रिक क्षमता लक्षणीयरीत्या वाढली.‘
पायरॉइलेक्ट्रिक क्षमता म्हणजे अशी क्षमता, ज्याद्वारे एखादा पदार्थ तापमानात बदल झाल्यावर विजेची निर्मिती करू शकतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फिल्म सामान्य खोलीच्या तापमानावरही उत्कृष्ट काम करते. केवळ 294 ते 301 केल्विन म्हणजेच साधारण 21 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान तापमानात किरकोळ बदल झाला, तरीही ही फिल्म वीज निर्माण करू शकते. याच कारणामुळे या तंत्रज्ञानाला भविष्यातील ‘सेल्फ-पावर्ड’ म्हणजेच स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करणारे तंत्रज्ञान मानले जात आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात स्मार्ट फोटोडिटेक्टर्स, कमी ऊर्जेवर चालणारे सेन्सर्स, परिधान करण्यायोग्य आरोग्य उपकरणे (उदा. स्मार्ट वॉच किंवा फिटनेस बँड) आणि मानवी शरीराच्या उष्णतेवर चालणार्या इलेक्ट्रॉनिक प्रणाली तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे वैज्ञानिकांनी सांगितले. यामुळे उपकरणांची बॅटरीवरील निर्भरता कमी होईल आणि लहान, हलकी तसेच ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे विकसित करता येतील. हे महत्त्वपूर्ण संशोधन ‘अॅडव्हान्स्ड फंक्शनल मटेरियल्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.