वॉशिंग्टन : सुपरहिरोंच्या जगात असे एक नाव ज्याच्याकडे कोणतीही दैवी शक्ती नाही किंवा जो दुसर्या ग्रहावरून आलेला नाही, तरीही तो जगभरातील करोडो चाहत्यांचा लाडका आहे, तो म्हणजे ‘बॅटमॅन’. आजचा दिवस या पात्रासाठी अत्यंत खास आहे, कारण 1939 मध्ये आजच्याच दिवशी ‘डिटेक्टिव्ह कॉमिक्स’ च्या 27 व्या अंकात बॅटमॅनने पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. विशेष म्हणजे हे पात्र लिओनार्डो दा विंची या महान चित्रकाराच्या एका चित्रामुळे प्रेरित होते.
सुपरमॅनच्या यशानंतर डीसी कॉमिक्स एका नवीन सुपरहिरोच्या शोधात होते. कलाकार बॉब केन यांनी 1938 मध्ये बॅटमॅनचे पहिले रेखाचित्र बनवले होते, जे आजच्या ‘डार्क नाईट’पेक्षा पूर्णपणे वेगळे होते. सुरुवातीच्या स्केचमध्ये बॅटमॅन चक्क लाल रंगाचा सूट, सोनेरी केस आणि एका छोट्या मास्कमध्ये होता. तो दिसायला बराचसा सुपरमॅनची कॉपी वाटत होता. बॅटमॅनच्या पंखांची रचना जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंची यांच्या ‘फ्लाइंग मशीन’च्या पेंटिंगवरून आणि ‘द बॅट व्हिस्पर्स’ या जुन्या हॉलीवूड चित्रपटावरून प्रेरित होऊन करण्यात आली होती.
बॅटमॅनला त्याचा खरा ‘डार्क’ आणि रहस्यमयी अवतार देण्याचे श्रेय लेखक बिल फिंगर यांना जाते. फिंगर यांनीच तो लाल सूट काढून त्याला काळा-राखाडी लूक दिला, तोंडावर नकाब चढवला आणि टोकदार कान दिले. गॉथम सिटी, बॅटमोबाईल, बॅटकेव्ह आणि अब्जाधीश ब्रूस वेनची संपूर्ण कथा ही बिल फिंगर यांच्याच कल्पनाशक्तीतून जन्मली होती. एका कायदेशीर करारामुळे 75 वर्षांपर्यंत जगाला फक्त ‘बॉब केन’ हेच एकमेव निर्माते आहेत असे वाटत राहिले. बिल फिंगर दुर्लक्षित राहिले आणि 1974 मध्ये अत्यंत गरिबीत त्यांचा मृत्यू झाला.
अखेर 2015 मध्ये डीसी कॉमिक्सने आपली चूक सुधारली आणि बिल फिंगर यांना अधिकृतपणे ‘सह-निर्माता’ म्हणून सन्मान दिला. सुरुवातीच्या काळात बॅटमॅन खूप हिंसक होता. तो गुन्हेगारांचा खात्मा करण्यासाठी बिनधास्त बंदूक चालवायचा. मात्र, कॉमिक्स वाचणार्या मुलांवर याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून 1940-41 च्या सुमारास त्याच्या हातातील बंदूक काढून घेण्यात आली. त्यानंतरच बॅटमॅनचा प्रसिद्ध ‘नो-किल रूल’ (कोणाचीही हत्या न करण्याचा नियम) लागू झाला आणि तो कायद्याचा सन्मान करणारा खरा हिरो बनला.