लंडन : कर्नाटकची राजधानी बंगळूर हे शहर जगातील सर्वात वेगाने वाढणारे टेक्नॉलॉजी सेंटर ठरले आहे. अनेक वर्षांपासून गुंतवणूकदार या शहराला पहिली पसंती बनवत आहेत. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे इथे सहज उपलब्ध असलेले 'टेक टॅलेंट'! तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 2016 पासून बंगळूर सातत्याने विकसित होत आहे. त्याची माहिती लंडनची एक एजन्सी 'डीलरूम डॉट कॉम'ने दिली आहे.
कंपनीच्या रिपोर्टनुसार या यादीत बंगळूरनंतर दुसर्या क्रमांकावर आहे इंग्लंडची राजधानी लंडन. त्यानंतर जर्मनीतील म्युनिच व राजधानी बर्लिन ही शहरे व फ्रान्सची राजधानी पॅरिसचा क्रमांक लागतो. सहाव्या स्थानावर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. 2016 मध्ये बंगळूरमध्ये गुंतवणूक 5.4 अब्ज डॉलर्सने वाढून 2020 मध्ये 7.2 अब्ज डॉलर्स झाली. मुंबईत गुंतवणूक 1.7 पटीने वाढून 0.7 अब्ज डॉलर्सवरून 1.2 अब्ज डॉलर्सवर गेली. लंडनमध्ये 2016 आणि 2020 दरम्यान तिप्पटीने वाढ नोंदवली गेली. ती 3.5 अब्ज डॉलर्सवरून 10.5 अब्ज डॉलर्स झाली.