Bajari Bhakri Health Benefits | हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचे सेवन ठरेल संजीवनी 
विश्वसंचार

Bajari Bhakri Health Benefits | हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचे सेवन ठरेल संजीवनी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भोगीचा सण आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी हे एक अतुट समीकरण आहे. ग्रामीण भागातील मुख्य अन्न असलेली ‘बाजरीची भाकरी’ आता जागतिक स्तरावर ‘सुपरफूड’ म्हणून ओळखली जात आहे. विशेषतः, हिवाळ्याच्या दिवसांत बाजरीचे सेवन केवळ शरीराला उबच देत नाही, तर अनेक गंभीर आजारांपासून संरक्षणही करते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

बाजरीमध्ये लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि फायबर (तंतुमय पदार्थ) भरपूर प्रमाणात असतात. इतर तृणधान्यांच्या तुलनेत बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बाजरीमध्ये मग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. बाजरीचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही. त्यामुळे मधुमेहींसाठी बाजरीची भाकरी गव्हाच्या पोळीपेक्षा अधिक फायदेशीर ठरते.

यात असलेल्या फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते. फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. बाजरीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने वाढत्या वयातील मुले आणि ज्येष्ठांच्या हाडांना बळकटी मिळते. लोहाचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बाजरी अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना गव्हातील ‘ग्लूटेन’ या प्रथिनाची अ‍ॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी बाजरी हा एक वरदान आहे.

बाजरी नैसर्गिकरीत्या ग्लूटेन-मुक्त असल्याने पचायला हलकी असते आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करते. बाजरीची प्रवृत्ती ‘उष्ण’ असते. थंडीच्या दिवसांत शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी आणि ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासाठी ग्रामीण भागात पूर्वापार बाजरी आणि लोणी किंवा गुळाचा वापर केला जातो. रोजच्या आहारात किमान एका वेळेस बाजरीच्या भाकरीचा समावेश केल्यास जीवनशैलीशी संबंधित अनेक आजार टाळता येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT