वॉशिंग्टन : अतिउंच पर्वतशिखरे असोत किंवा समुद्राची अथांग खोली, मानवाने प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मात्र, हे केवळ जिद्दीमुळे शक्य झाले नसून, हजारो वर्षांच्या उत्क्रांती प्रक्रियेत मानवी शरीरात झालेल्या प्रत्यक्ष ‘जैविक’ बदलांमुळे हे शक्य झाले आहे, असा खुलासा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. त्यामध्ये पाण्याखाली रोज चार-पाच तास घालवू शकणार्या बाजाऊ लोकांचा किंवा हिमालयातील उत्तुंग ठिकाणी कमी ऑक्सिजनमध्ये राहू शकणार्या तिबेटी लोकांचाही समावेश आहे.
ड्युक युनिव्हर्सिटीचे मानववंशशास्त्रज्ञ प्रा. हर्मन पॉन्टझर यांनी त्यांच्या ‘अॅडॅप्टेबल’ या 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात मानवी शरीरातील या आश्चर्यकारक बदलांचे विश्लेषण केले आहे. संशोधनानुसार, जगातील अत्यंत कठीण किंवा टोकाच्या वातावरणात राहणार्या लोकांच्या शरीरात काही विशिष्ट बदल दिसून आले आहेत : विशाल प्लीहा : समुद्राच्या खोल पाण्यात राहणार्या समुदायांमध्ये (उदा., बाजाऊ लोक) मोठी प्लीहा विकसित झाली आहे, जी त्यांना पाण्यात जास्त काळ श्वास रोखून धरण्यास मदत करते. विस्तारित फुफ्फुस : अतिउंच ठिकाणी, जिथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते, अशा ठिकाणी राहणार्या लोकांच्या फुफ्फुसांची क्षमता नैसर्गिकरीत्या वाढलेली आढळली आहे. उदा., तिबेटी लोक. प्राचीन जनुकांचा वारसा : काही मानवी समूहांना ‘डेनिसोव्हन’ या आता नामशेष झालेल्या मानवी प्रजातीकडून काही विशेष जनुके वारशाने मिळाली आहेत, ज्यामुळे त्यांना कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणात जगणे सोपे जाते. प्रा. पॉन्टझर यांच्या मते, पृथ्वीवरील प्रत्येक खंडात (अँटार्क्टिका वगळता) मानवाचा वावर आहे. मात्र, वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतील समस्या सोडवण्यासाठी मानवी उत्क्रांतीने वेगवेगळे मार्ग निवडले. विज्ञान आता या बदलांचे दस्तऐवजीकरण करू लागले असून, हे बदल मानवी लवचीकतेचे उत्तम उदाहरण आहेत. पृथ्वीवरील सर्वात टोकाच्या वातावरणात स्थिरावलेल्या मानवी लोकसंख्येने स्वतःच्या शरीरातच अशा सुधारणा केल्या आहेत, ज्या विज्ञानाला आजही थक्क करत आहेत.