नवी दिल्ली : अवघ्या तीन महिन्यांच्या बाळांच्या मेंदूचे स्कॅन करून त्यांच्या पुढील सहा महिन्यांतील भावनिक विकास आणि स्वतःला शांत करण्याच्या क्षमतेचा अंदाज लावता येऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. या शोधामुळे वर्तणुकीशी संबंधित आणि भावनिक आव्हाने निर्माण होण्याचा धोका असलेल्या बालकांना वेळीच ओळखण्यास मदत होऊ शकते.
अमेरिकेतील पिटस्बर्ग विद्यापीठाच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील एका टीमने 95 बालके आणि त्यांच्या पालकांचा अभ्यास केला. या अभ्यासात मेंदूतील व्हाईट मॅटरच्या रचनेचा भावनिक परिणामांशी स्पष्ट संबंध असल्याचे आढळून आले. व्हाईट मॅटरला मेंदूचा ‘माहिती महामार्ग’ म्हटले जाते, जो मेंदूच्या विविध भागांमध्ये जलद संवाद साधण्यास मदत करतो.
संशोधनात असे दिसून आले की, ज्या बाळांच्या मेंदूतील ‘फोर्सिप्स मायनर’ (मेंदूच्या दोन्ही गोलार्धांना जोडणारा व्हाईट मॅटरचा एक भाग) मध्ये न्यूरॉनची टोके अधिक विरळ होती, त्यांच्यात तीन ते नऊ महिन्यांच्या वयात नकारात्मक भावनांमध्ये वाढ झाली. याउलट, ज्या बाळांच्या ‘डाव्या सिंगुलम बंडल’ (कार्यकारी नियंत्रणाशी संबंधित मेंदूच्या भागांना जोडणारा मार्ग) मध्ये अधिक गुंतागुंतीची रचना होती, त्यांच्यात अधिक सकारात्मक भावना आणि स्वतःला शांत करण्याची सुधारित क्षमता दिसून आली. ‘जेनोमिक सायकिअॅट्री’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये हे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत.
पिटस्बर्ग विद्यापीठातील मानसोपचार विभागाच्या प्रमुख संशोधक प्राध्यापिका मेरी एल. फिलिप्स म्हणाल्या, ‘या सुरुवातीच्या न्यूरल मार्कर्समुळे बालकांच्या मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन बदलू शकतो, ज्यामुळे विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर योग्य हस्तक्षेप करणे शक्य होईल. या अभ्यासात ‘न्यूराईट ओरिएंटेशन डिस्पर्शन अँड डेन्सिटी इमेजिंग (NODDI)’ या प्रगत ‘एमआरआय’ तंत्राचा वापर करण्यात आला, ज्यामुळे विकसनशील मेंदूच्या ऊतींची सूक्ष्म रचना समजून घेणे शक्य झाले.
या अभ्यासाचे निष्कर्ष बालरोग काळजी आणि बालपणीच्या सुरुवातीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मेंदूतील भावनिक विकासाचे वस्तुनिष्ठ निर्देशक ओळखल्यास, वर्तणुकीशी संबंधित समस्या गंभीर होण्यापूर्वीच बालकांमधील धोक्याचे घटक ओळखण्यास वैद्यकीय व्यावसायिकांना मदत मिळू शकते. यामुळे लवकर आणि अधिक प्रभावी उपचारपद्धती विकसित करता येतील, ज्यामुळे मुलांचे भावनिक भविष्य सुरक्षित होण्यास मदत होईल.