वॉशिंग्टन : अमेरिकेतील अयान्ना विल्यम्स या महिलेच्या नावाची 'सर्वात लांब नखे असणारी महिला' अशी नोंद गिनिज बुकमध्ये झाली होती. तिने तब्बल तीस वर्षे आपली नखे कापली नव्हती व त्यांची देखभाल केली होती. आता तीस वर्षांनंतर तिने आपली ही विक्रमी नखे कापली आहेत.
तिची नखे कापली गेली त्यावेळी त्यांची एकूण लांबी 24 फूट 0.7 इंच होती. अयान्नाने या ताज्या रेकॉर्डच्या सहाय्याने आपलाच जुना विक्रम मोडला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्च्या डॉ. एलिसन रीडिंग यांनी सांगितले की त्यांनी एका ब्लेडचा वापर करून तिची ही नखे कापली. अयान्ना किशोरवयीन असताना तिला नेलआर्टची हौस होती. लांब नखे ठेवून ती वेगवेगळ्या पद्धतीने रंगवणे तिला आवडत असे. याच आवडीतून तिने नखे वाढवण्यास सुरुवात केली होती व ती इतकी लांब झाली! तिच्या नावाची नोंद सर्वप्रथम 2017 मध्ये गिनिज बुकमध्ये झाली. त्यानंतर 2018 मध्येही तिचे नाव नोंदवले गेले. त्यावेळी तिच्या नखांची एकूण लांबी 18 फूट 10.9 इंच होती. इतक्या लांब नखांची काळजी घेणे व त्यांना सुंदर ठेवणे हे कठीण कामच होते. आता तिची ही कापलेली नखे फ्लोरिडाच्या ओरलांडोमधील एका म्युझियममध्ये ठेवली जाणार आहेत.