Oregon Volcano Danger | ऑरेगॉनच्या किनार्‍याजवळील ज्वालामुखी केव्हाही फुटू शकतो! 
विश्वसंचार

Oregon Volcano Danger | ऑरेगॉनच्या किनार्‍याजवळील ज्वालामुखी केव्हाही फुटू शकतो!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : अमेरिकेतील ऑरेगॉनच्या किनार्‍यापासून दूर असलेल्या अ‍ॅक्सियल सीमाऊंट या अत्यंत सक्रिय पाण्याखालील ज्वालामुखीचा (अंडरवॉटर व्हॉल्कॅनो) उद्रेक 2026 च्या मध्य ते अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक या ज्वालामुखीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अ‍ॅक्सियल सीमाऊंट ईशान्य पॅसिफिक महासागरातील (नॉर्थईस्ट पॅसिफिक ओशन) हा सर्वात सक्रिय पाण्याखालील ज्वालामुखी आहे. तो जुआन दे फुका रिज नावाच्या टेक्टॉनिक प्लेट सीमेवर स्थित आहे. या सीमेवर पॅसिफिक आणि जुआन दे फुका प्लेटस् एकमेकांपासून दूर सरकत असल्याने पृथ्वीच्या गाभ्यातून मॅग्मा (वितळळेला किंवा अर्धवट वितळलेला खडक) वर येतो आणि साठतो. या ज्वालामुखीचा उद्रेक यापूर्वी 1998, 2011 आणि 2015 मध्ये झाला आहे. हा पाण्याखालील ज्वालामुखी असल्याने त्याचे थेट निरीक्षण करणे कठीण आहे. वैज्ञानिक दोन मुख्य लक्षणांचा अभ्यास करतात.

यामध्ये समुद्रतळ फुगणे (सीफ्लोअर इन्फ्लेशन) ही प्रक्रिया होय. ज्वालामुखीच्या खाली मॅग्मा साठल्यामुळे समुद्रतळ वर येतो. याला इन्फ्लेशन म्हणतात. अ‍ॅक्सियल येथे उद्रेक होण्यासाठी समुद्रतळ एका विशिष्ट उंचीपर्यंत फुगणे आवश्यक असते. हा उंबरठा प्रत्येक उद्रेकानंतर थोडासा वाढत जातो. 2015 च्या उद्रेकापूर्वीच्या स्थितीपेक्षा समुद्रतळ सध्या सुमारे 4 इंच (10 सेंटीमीटर) अधिक उंच झाला आहे. अंदाजानुसार, पुढील उद्रेकासाठी अजून 8 इंच (20 सेंटिमीटर) फुगवट आवश्यक असू शकते. दुसरे लक्षण म्हणजे भूकंपीय क्रिया. यामध्ये पाण्याखालील भूकंपांची वाढलेली नोंद मॅग्माच्या हालचाली आणि भूकवचामधील (क्रस्ट) तणाव दर्शवते.

या उद्रेकामुळे आजूबाजूच्या जल-औष्णिक छिद्रांवर (हायड्रोथर्मल वेंटस) आणि स्थानिक समुद्री परिसंस्थेवर (लोकल ओशन इकोसिस्टीम) महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. मॅग्मा साठण्याचा दर आणि भूकंपांचे स्वरूप अनिश्चित असल्याने उद्रेकाची अचूक वेळ सांगणे हे मोठे आव्हान आहे. ऑरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे बिल चॅडविक यांच्या मते, सध्याचे अंदाज हे केवळ ऐतिहासिक नमुन्यांवर (हिस्टॉरिकल पॅटर्न ) आधारित आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी, वैज्ञानिक नोव्हेंबर 2025 पासून भौतिकशास्त्रआधारित मॉडेल्सची (फिजिक्स बेस्ड मॉडेल्स) चाचणी करण्यासाठी रिअल टाईम डेटा वापरत आहेत, ज्यामुळे भविष्य वर्तवण्याची अचूकता वाढू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT