मॉस्को ः रशियन शास्त्रज्ञांनी सैबेरियाच्या पर्माफ्रॉस्टमध्ये सापडलेल्या तब्बल 1,30,000 वर्षांपूर्वीच्या एका लहानग्या मॅमथचे शवविच्छेदन ( necropsy) केले आहे. या मॅमथचं नाव ‘याना’ असं ठेवण्यात आलं असून, डिसेंबर 2024 मध्ये ती पहिल्यांदा जगासमोर सादर करण्यात आली होती.
‘असोसिएटेड प्रेस’ च्या माहितीनुसार, याना ही आतापर्यंत सापडलेली सर्वाधिक चांगल्या अवस्थेतील मॅमथ आहे. तिच्या शरीराचा पुढचा भाग पूर्णपणे जपलेला आहे आणि दिसायला ती हत्तीच्या एखाद्या सर्वसामान्य पिल्लासारखीच दिसते. फ्रेंच वृत्तसंस्था ‘एएफपी’च्या अहवालानुसार, मार्च 2025 च्या शेवटी याकुत्स्कमधील नॉर्थ-ईस्टर्न फेडरल युनिव्हर्सिटीच्या मॅमथ म्युझियममध्ये यानाचं शवविच्छेदन करण्यात आलं. ही प्रक्रिया अनेक तास चालली. रशियामधील इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपिरिमेंटल मेडिसिन येथील आर्टेमी गोन्चारोव यांच्या मते, ‘हे शवविच्छेदन म्हणजे पृथ्वीच्या भूतकाळात डोकावण्याची संधी आहे.’ यानाचं शरीर हजारो वर्षे बर्फमिश्रित खडक व मातीयुक्त गोठलेल्या जमिनीत म्हणजेच पर्माफ्रॉस्टमध्ये जपलेलं होतं. मात्र, हवामान बदलामुळे बर्फ वितळल्यावर तिचा मृतदेह उजेडात आला.
‘एएफपी’च्या अहवालानुसार, तिच्या शरीराचा पुढचा भाग उतारावरून खाली घसरू लागला होता; पण मागचा भाग अजूनही मातीत अडकलेला असल्याने ती पूर्णपणे खाली कोसळली नव्हती. शास्त्रज्ञांनी यानाच्या अवशेषांचा सविस्तर अभ्यास केला. तिच्या मृतदेहातून कुजलेल्या माती आणि मांसाचा एक विचित्र वास येत होता, असं एएफपीने नमूद केलं. यानाची खांद्यापासून उंची सुमारे 1.2 मीटर (3.9 फूट) होती आणि वजन सुमारे 180 किलोग्रॅम (400 पाऊंड) होतं. तिचं डोकं आणि सोंड पूर्ण अवस्थेत होतं, तसेच तिचे दुधाचे दातदेखील शास्त्रज्ञांना आढळले. हे दात मॅमथ मोठं होत असताना मानवाच्या दुधाच्या दातांप्रमाणे गळून पडतात. यानाचे अंतर्गत अवयवही ओळखण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. यानाचं शवविच्छेदन म्हणजे केवळ प्राणिविज्ञानातील नाही, तर पृथ्वीच्या पर्यावरणीय आणि हवामानशास्त्रीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जातो.