नवी दिल्ली : जेव्हा आपण एखाद्या पार्कमध्ये किंवा ऐतिहासिक ठिकाणी जातो आणि तिथे चारही बाजूंना कचरा पाहतो, तेव्हा अनेकदा सरकार किंवा प्रशासनाला दोष देऊन पुढे निघून जातो; पण दिल्लीच्या १७ वर्षीय माही मल्हानीने असे केले नाही. अमिटी इंटरनॅशनल स्कूल (मयूर विहार) मधील बारावीची विद्यार्थिनी असलेल्या माहीने एका स्कूल ट्रिपदरम्यान 'सुंदर नर्सरी' येथे कचराकुंडी शेजारीच असूनही लोकांनी जमिनीवर कचरा टाकल्याचे पाहिले. या दृश्याने तिचे मन हेलावून सोडले आणि तिने तंत्रज्ञानाच्या मदतीने यावर तोडगा काढण्याचे ठरवले. माहीने तिच्या कोडिंग कौशल्याचा वापर करून 'TRASHbot' नावाचा एक स्वायत्त (autonomous) एआय रोबो तयार केला आहे, जो स्वतः चालत जाऊन कचरा गोळा करतो आणि त्याचे वर्गीकरणही करतो.
२०२३ मध्ये माही तिच्या शाळेच्या वतीने एका हेरिटेज टूरवर गेली होती. तिथे तिने पाहिले की, कचराकुंडी अगदी जवळ असूनही लोक कचरा खाली फेकत होते. माहीच्या लक्षात आले की, समस्या फक्त जागरूकतेची नसून सोयीची आणि जबाबदारीची आहे. बालपणापासून कोडिंग, पायथन, सी++ (C++) आणि जावास्क्रिप्ट शिकणाऱ्या माहीने ठरवले की, ती यंत्रांना माणसासारखे हुशार बनवेल, जेणेकरून ही रोजची समस्या सुटू शकेल. येथूनच तिच्या डोक्यात एका चालत्या-फिरत्या रोबोटिक डस्टबिनची कल्पना आली. माहीने आपल्या या प्रोजेक्टला मोठे रूप देण्यासाठी संशोधन सुरू केले. या दरम्यान तिला आयआयटी दिल्लीच्या 'रँचो लॅब्स' या रोबोटिक्स स्टार्टअपकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. तिच्या शाळेतील शिक्षकांनी आणि मेंटर्सनीही तिला पूर्ण प्रोत्साहन दिले. मात्र, माहीने या रोबोचा प्रोटोटाइप (प्रारंभिक मॉडेल) संपूर्णपणे स्वतःच्या हाताने तयार केला.
स्वतंत्रपणे काम करण्याच्या या अनुभवामुळे तिचा आत्मविश्वास खूप वाढला आणि ती दिवस-रात्र या रोबोला अधिक चांगला बनवण्यासाठी कामाला लागली. 'TRASHbot' ची पहिली यशस्वी चाचणी माहीचे घर आणि तिच्या शाळेच्या कॅफेटेरियामध्ये झाली. शाळेच्या फिजिक्स विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. सिंघल यांच्या मते, रोबोला टेबलच्या मधून फिरून वेष्टने (wrappers) गोळा करताना पाहणे अद्भुत होते. यानंतर नोएडा येथील 'लोटस बुलेवार्ड'सारख्या मोठ्या निवासी सोसायट्या आणि उदयपूर महानगरपालिकेतही याचा वापर करण्यात आला. सोसायट्यांमधील रहिवाशांचे म्हणणे आहे की, हा रोबो कचरा टाकल्यावर स्वतःहून तो योग्य केबिनमध्ये टाकतो, ज्यामुळे त्यांचे काम खूप सोपे झाले आहे. हा रोबो अडथळे टाळण्यात ९८ टक्के आणि कचरा वेगळा करण्यात ९० टक्क्यांपर्यंत अचूक आहे. काही सुधारणांनंतर माहीने याचा खर्च कमी करून अवघा ७,००० रुपये केला आहे, जो मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्यास ४,००० रुपयांपर्यंत खाली आणला जाऊ शकतो.
कसा काम करतो 'TRASHbot'?
हा कोणताही साधा डस्टबिन नसून पूर्णपणे ऑटोमॅटिक काम करतो. याला स्मार्टफोन ॲपद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. यामध्ये असलेले अल्ट्रासॉनिक सेन्सर्स याला कोणत्याही अडथळ्याशी धडकण्यापासून वाचवतात. कचरा ओळखण्यासाठी यात कॅमेरा आणि YOLOv3 नावाचे AI मॉडेल बसवण्यात आले आहे. हा रोबो कचरा पाहताच तो ओला आहे की सुका, हे ओळखतो. इमेज प्रोसेसिंगसाठी यात 'रास्पबेरी पाय' (Raspberry Pi) आणि हालचालीसाठी 'आर्डुइनो युनो' (Arduino Uno) चा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे तो अत्यंत स्मार्ट बनतो.