विश्वसंचार

दक्षिण कोरियात ढेकणांचा उच्छाद; नागरिकांच्या उद्रेक, अधिकार्‍यांना ढेकणांशी दोन हात करण्याची वेळ

Arun Patil

सेऊल : 'विकसित' म्हणून मिरवणार्‍या अनेक देशांमध्ये भलत्याच समस्या उग्र झालेल्या पाहायला मिळतात. फ्रान्समध्ये आधी उंदरांचा सुळसुळाट झाला होता व त्यानंतर ढेकणांची समस्या आयफेल टॉवरइतकी मोठी झाली! आता असाच प्रकार दक्षिण कोरियात झाला आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये ढेकणांचा उच्छाद वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या उद्रेकामुळे सेऊलमधल्या अधिकार्‍यांना चक्क ढेकणांशी दोन हात करावे लागत आहेत.

दक्षिण कोरियाच्या सेऊल, बुसान आणि इंचॉन शहरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ढेकणांचे 17 उद्रेक झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. सेऊल प्रशासनाने ढेकणांशी लढण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. तसेच याविरोधात लढण्यासाठी तब्बल 500 मिलियन वॉन (3.83 लाख डॉलर्स/ 3 कोटी 19 लाख रुपये) इतका निधी बाजूला काढून ठेवला आहे. याआधी फ्रान्स आणि यूकेमध्येही ढेकणांची समस्या निर्माण झाली होती. तेव्हा तिथल्या काही प्रदेशात ढेकणांची दहशत पसरली होती.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोरियातील डेगू शहरातील एका विद्यापीठात सर्वात आधी ढेकणांचा प्रादुर्भाव नोंदवण्यात आला होता. डेगू शहरात सर्वत्र ढेकणं दिसत होती. तेव्हापासून दक्षिण कोरियन नागरिक ढेकणांच्या भीतीने चित्रपटगृहांमध्ये जाणं टाळतात, तसेच सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करत नाहीत. दक्षिण कोरियासाठी ढेकणांची समस्या नवी नाही. यापूर्वी दक्षिण कोरियाने 1960 साली देशव्यापी मोहीम हाती घेऊन ढेकूण नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तत्कालीन सरकार यशस्वीदेखील झालं होतं. परंतु, या समस्येनं आता पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे.

सेऊल प्रशासन आता सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, हॉटेलांची स्वच्छता यावर भर देत आहे. ढेकणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यासाठी सेऊल सरकारने तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. ढेकणांचा उच्छाद रोखण्यासाठी सेऊलमध्ये वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. परंतु यापैकी अनेक कीटकनाशके कुचकामी ठरली आहेत. त्यावरून सरकारच्या कारभारावर बोट ठेवले जात आहे!

SCROLL FOR NEXT