कॅनबेरा : निसर्गाच्या चमत्कारांनी नटलेल्या या पृथ्वीवर अनेक आश्चर्य दडलेली आहेत. नुकत्याच समोर आलेल्या भौगोलिक संशोधनानुसार, ऑस्ट्रेलियातील ‘फिंक नदी’ ही जगातील सर्वात जुनी नदी असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक आदिवासी आरर्नटे भाषेत या नदीला ‘लारापिंटा’ या नावाने ओळखले जाते.
वैज्ञानिकांच्या मते, फिंक नदीचा उगम साधारणपणे 30 ते 35 कोटी वर्षांपूर्वीचा असावा. ही नदी तेव्हापासून आपल्या मूळ मार्गावरून वाहत आहे, जेव्हा पृथ्वीवर डायनासोरचे अस्तित्वही नव्हते. या नदीचा उगम मध्य ऑस्ट्रेलियातील मॅकडोनेल पर्वतरांगांमधून होतो आणि ती साधारण 600 किलोमीटरहून अधिक अंतर कापत सिमसन वाळवंटापर्यंत जाते. जगातील इतर अनेक नद्यांनी काळाच्या ओघात आपले मार्ग बदलले. परंतु, फिंक नदीने आपला मार्ग बदलला नाही.
पर्वतरांगांच्या निर्मितीपूर्वीपासून ही नदी अस्तित्वात असल्याचे पुरावे भूगर्भीय संशोधनातून मिळाले आहेत. स्थानिक ‘आरर्नटे’ लोकांसाठी ही नदी केवळ पाण्याचा स्त्रोत नसून त्यांच्या संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. फिंक नदी वर्षातील बराच काळ कोरडी असते. परंतु, मोठ्या पावसानंतर ती जेव्हा प्रवाहित होते, तेव्हा मध्य ऑस्ट्रेलियातील वाळवंटी भागात जैवविविधता फुलते. तिचे प्राचीन अस्तित्व जगातील शास्त्रज्ञ आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.