वॉशिंग्टन : नासाचा अंतराळवीर जोनाथन योंग जॉनी किम याने नुकताच एक अपूर्व नजारा कॅमेर्यात बंदिस्त केला आहे. त्याने अंतराळातून पृथ्वीवरील ऑरोरा लाईटस्चा टाइम-लॅप्स मोडमध्ये व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर शेअर करताच प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शुक्रवारी शेअर करण्यात आला असून, यामध्ये पृथ्वीचा भाग वरून कसा दिसतो हे पाहता येते. याशिवाय दक्षिण आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या वरच्या बाजूला बघायला मिळणार्या रंगीबेरंगी ऑरोरा लाईटस्ची जादू पाहायला मिळते. सुरुवातीला एक हिरवट प्रकाश आकाशात पसरताना दिसतो आणि नंतर त्यात लाल आणि जांभळ्या रंगाची छटाही बघायला मिळते.
‘माझा पहिला ऑरोरा कॅप्चर केला.’ या भावनिक शब्दात जोनाथन किमने या पोस्टची सुरुवात केली आहे. पुढे तो म्हणतो, ‘हा संपूर्ण अनुभव एखाद्या मासेमारीसारखा वाटला. कॅमेरा सेट करणे, अँगल शोधणे, सेटिंग्ज करणं, माऊंट तयार करणे, सगळे जुळवून टाइमर लावणे आणि मग काही मिळतंय का यासाठी परत येणे. जसे पहिला मासा पकडल्यानंतर माणूस वेडा होतो, तसेच काहीसे माझे झाले आहे.’ किमने त्याच्या सहकारी अंतराळवीर निकोल एयर्सचे विशेष आभार मानले आहेत. निकोल एयर्सनेच त्याला टाइम-लॅप्स कसा तयार करायचा हे शिकवले.
विशेष म्हणजे, निकोल एयर्स ही अंतराळातून ऑरोरा लाईटस्चे फोटो आणि व्हिडीओ नियमितपणे सोशल मीडिया ‘एक्स’वर शेअर करत असते. किम 2017 मध्ये ‘नासा’चा अधिकृत अंतराळवीर म्हणून निवडला गेला. यावर्षी 8 एप्रिल रोजी रशियन सोयुझ रॉकेटमधून त्याने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेसाठी प्रस्थान केले. अंतराळात जाण्यापूर्वी तो 2002 पासून अमेरिकन लष्करात विविध पदांवर कार्यरत होता. अंतराळातून टिपलेला हा नजारा फक्त टेक्निकल कमाल नाही, तर निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याची आठवण करून देणारा एक मंत्रमुग्ध करणारा क्षणही ठरतोय.