Atacama Desert | अटाकामा वाळवंटावर कृत्रिम प्रकाशाचे संकट! 
विश्वसंचार

Atacama Desert | अटाकामा वाळवंटावर कृत्रिम प्रकाशाचे संकट!

जगातील सर्वात अंधार असलेल्या क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणामुळे खगोलशास्त्रज्ञ चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

सॅन्टियागो : दक्षिण अमेरिकेतील चिली देशात असलेले अटाकामा वाळवंट (अटाकामा डेझर्ट) हे पृथ्वीवरील सर्वात गडद आणि मानवी वस्ती नसलेल्या ठिकाणांपैकी एक मानले जाते. येथील प्रदूषणमुक्त आणि अथांग काळ्या कुट्ट आकाशामुळे हे ठिकाण खगोलशास्त्रज्ञांसाठी जगातील सर्वात नंदनवन ठरले आहे. मात्र, आता मानवनिर्मित कृत्रिम प्रकाशाच्या (लाईट पोल्युशन) वाढत्या आक्रमणामुळे जगातील हे सर्वात मौल्यवान अंधार असलेले क्षेत्र धोक्यात आले आहे.

अटाकामा वाळवंट खगोलशास्त्रासाठी का महत्त्वाचे?

अटाकामा वाळवंटात युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरी (ईएसओ) द्वारे संचलित पॅरानल नावाचे एक जागतिक दर्जाचे खगोलशास्त्रीय केंद्र आहे. 2,600 मीटर उंचीवर असलेल्या या केंद्रात जगातील सर्वात प्रगत दुर्बिणी (टेलिस्कोपीज) आहेत, त्यात व्हेरी लार्ज टेलिस्कोप (व्हीएलटी) आणि 2027 पर्यंत पूर्ण होणार्‍या एक्सट्रीमली लार्ज टेलिस्कोप (ईएलटी) चा समावेश आहे.

उघड्या डोळ्यांनी दिसतात आकाशगंगा

अटाकामा वाळवंटातील आकाश इतके स्वच्छ असते की, आपल्या आकाशगंगेचा (मिल्की वे) पांढरा पट्टा आणि तब्बल 2 लाख प्रकाशवर्षे दूर असलेल्या मॅगेलॅनिक क्लाउडस् या दोन छोट्या शेजारील आकाशगंगा मानवी डोळ्यांना स्पष्ट दिसतात. सौरमालेबाहेरील ग्रहाचे (एक्सोप्लॅनेट) पहिले थेट छायाचित्र आणि आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या अवाढव्य कृष्णविवराचे (सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल) अस्तित्व शोधण्यात याच केंद्राचा मोठा वाटा आहे.

अंधाराला प्रदूषणाचा धोका

वाढत्या नागरीकरणामुळे आज जगातील 80 टक्के लोकसंख्या ही प्रकाश प्रदूषणाच्या छायेखाली जगते आहे. 2011 ते 2022 दरम्यान जागतिक स्तरावर प्रकाश प्रदूषण दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढले आहे. अटाकामा वाळवंट आतापर्यंत मानवी वस्तीपासून दूर असल्याने सुरक्षित होते; परंतु आता खाणकाम (मायनिंग), ऊर्जा प्रकल्प आणि जवळच्या शहरांमधील वाढत्या दिव्यांमुळे हा अंधार नाहीसा होत आहे. इना (आयएनएनए) नावाच्या एका मोठ्या औद्योगिक प्रकल्पाचे काम पॅरानल केंद्राच्या अगदी जवळ प्रस्तावित केले होते. शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे दुर्बिणींवरील प्रकाश प्रदूषण 50 टक्क्यांनी वाढले असते.

सुदैवाने, या कंपनीने या वर्षाच्या (2026) सुरुवातीला आपला प्रकल्प मागे घेतला; परंतु भविष्यात असे इतर प्रकल्प येण्याची भीती कायम आहे. चिली विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ एडुआर्डो उंडा-सांझना यांच्या मते, चिलीमधील सध्याचे कायदे 1970 च्या दशकातील नियमांवर आधारित आहेत, ज्यात 10 टक्क्यांपर्यंत प्रकाश प्रदूषणाची परवानगी दिली जाते. मात्र, पॅरानलसारख्या संवेदनशील केंद्रासाठी 1 टक्क्यापेक्षा जास्त प्रकाश वाढणेदेखील विज्ञानाचे नुकसान करणारे आहे. याशिवाय, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे हजारो सॅटेलाइटस् रात्रीच्या आकाश निरीक्षणात अडथळा आणत आहेत. जर आपण पृथ्वीवरील हा नैसर्गिक अंधार गमावला, तर आपण केवळ विज्ञानाचेच नुकसान करणार नाही, तर मानवाचा विश्वाशी असलेला आदिम संबंधही कायमचा तुटून जाईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT