वॉशिंग्टन : धूमकेतूला लांबलचक शेपूट असते, हे आपल्याला माहिती आहे. मात्र, असा प्रकार एखाद्या ग्रहाबाबतही घडू शकतो याची आपण कल्पना करणार नाही. आता खगोलशास्त्रज्ञांनी अशा शेपूट असलेल्या बाह्यग्रहाचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे या ग्रहाची शेपूट इतकी लांब आहे की, त्यामध्ये 40 पृथ्वी सामावू शकतील!
हा ग्रह त्याच्या तार्याच्या अगदी जवळ आहे. त्याची ही शेपटीसारखी रचना त्याच्या वातावरणातून ‘लीक’ होणार्या वायूने बनलेली आहे. तिला तारकीय वार्यांनी उडवले जात आहे ज्याला ‘विंडसॉक’ म्हटले जाते. या बाह्यग्रहाचे नाव ‘डब्ल्यूएएसपी-69बी’ असे आहे. हा आपल्या ग्रहमालिकेतील गुरूसारखा निव्वळ वायूचा गोळा आहे. त्याचा आकारही जवळजवळ गुरूइतकाच आहे; मात्र त्याचे वस्तुमान एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 160 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. तार्यापासून अतिशय कमी अंतरावर असल्याने हा ग्रह केवळ 3.9 दिवसांमध्येच त्याच्या तार्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. याचा अर्थ या ग्रहावरील ‘वर्ष’ हे अवघ्या 3.9 दिवसांचेच असते. या ग्रहामधून प्रति सेकंद 2 लाख टन वायू बाहेर पडत आहे. त्यामध्ये बहुतांशी प्रमाण हे हेलियम आणि हायड्रोजनचे आहे.
अतिशय उष्ण ग्रह असल्याने हा प्रकार घडत असल्याचे मानले जाते. गेल्या सात अब्ज वर्षांपासून त्याच्यामधून असा वायू बाहेर पडत आहे. ज्या वेगाने या ग्रहामधून वायू उत्सर्जित होत आहे, त्यामुळेच या बाह्यग्रहाने आपल्या जीवनकाळात सात पृथ्वींइतके वस्तुमान गमावले असल्याचे मानले जाते. हवाईमधील वेधशाळेच्या डेटानुसार या बाह्यग्रहाची शेपूट 5.6 लाख किलोमीटर अंतरापर्यंत गेली असून, हे अंतर पृथ्वीच्या रुंदीपेक्षा 44 पट अधिक आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील संशोधक डकोटा टायलर यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.