शास्त्रज्ञांना आढळला सर्वात लहान वयाचा बाह्यग्रह  
विश्वसंचार

Exoplanet Discovery : शास्त्रज्ञांना आढळला सर्वात लहान वयाचा बाह्यग्रह

मानवाच्या तुलनेत फक्त दोन-तीन दिवसांचे बाळ!

पुढारी वृत्तसेवा

वाॅशिंग्टन : अवकाशातील आपल्या ताऱ्याभोवतीच्या धुलिकणांच्या कवचातून बाहेर येणारा एक अत्यंत नवीन बाह्यग्रह शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. हा आजवरचा सर्वात लहान वयाचा बाह्यग्रह ठरला असून त्याचे वय १० लाख वर्षांपेक्षाही कमी आहे. या शोधामुळे आपल्या पृथ्वीसह इतर ग्रहांची निर्मिती कशी झाली, याचा अभ्यास करण्यास खगोलशास्त्रज्ञांना मोठी मदत होणार आहे.

‘इलियास २-२४ बी’ (Elias 2-24 b) असे नाव देण्यात आलेल्या या ग्रहाचे वस्तुमान आपल्या गुरू ग्रहाच्या दोन ते चार पट जास्त आहे. हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून नेपच्यून ग्रहाच्या अंतरापेक्षा दुप्पट अंतरावर फिरत आहे. हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे ४५० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका नव्या ताऱ्याभोवती फिरत आहे. २०१७ मध्ये खगोलशास्त्रज्ञांना या ग्रहाचे पहिले संकेत मिळाले होते. ताऱ्याच्या सभोवतालच्या वायू आणि धुळीच्या तबकडीमध्ये (Protoplanetary Disk) एक लहानशी पोकळी/गॅप दिसून आली होती. यावरून तेथे ग्रहाची निर्मिती होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, परंतु त्यावेळी हा ग्रह थेट दिसत नव्हता.

‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांनी जगातील तीन मोठ्या दुर्बिणींच्या (हवाईतील केक ऑब्झर्व्हेटरी, चिलीमधील अल्मा आणि व्हेरी लार्ज टेलिस्कोप) मदतीने एकत्र अभ्यास केला. या दुर्बिणींमुळे या ग्रहाचे थेट छायाचित्र घेणे आणि त्याचे वय १० लाख वर्षांपेक्षा कमी असल्याचे सिद्ध करणे शक्य झाले. ‘‘हा ग्रह आजवर शोधलेला सर्वात तरुण ग्रह आहे. तो अजूनही आपल्या सभोवतालच्या पदार्थांना स्वतःमध्ये शोषून घेत आहे. त्यामुळे ग्रहनिर्मितीचा असा टप्पा पाहायला मिळणे अत्यंत दुर्मीळ आहे,’’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक अँड्रिया बर्नार्डी यांनी सांगितले. हा नवा ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा तब्बल ५,००० पट लहान आहे. मानवाच्या सरासरी आयुष्याशी तुलना केली तर, ‘इलियास २-२४ बी’ हा ग्रह अवघ्या दोन किंवा तीन दिवसांच्या बाळासारखा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT