खगोलशास्त्रज्ञांनी शोधले ‘सुपरसॉनिक जेट स्ट्रीम’! Pudhari File Photo
विश्वसंचार

खगोलशास्त्रज्ञांनी शोधले ‘सुपरसॉनिक जेट स्ट्रीम’!

हे वारे अंतराळात आतापर्यंत नोंदवलेले सर्वात वेगवान वारे आहेत

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली वार्‍याचा वेग ताशी 407 किलोमीटर इतका नोंदवला गेला आहे. मात्र, आता वैज्ञानिकांनी ताशी 33000 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळ शोधले आहे. खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सौरमंडळाबाहेरील एका परग्रहावर ‘सुपरसॉनिक जेट स्ट्रीम’ म्हणजेच अतिवेगाने वाहणारा वारा शोधला आहे. हे वारे अंतराळात आतापर्यंत नोंदवलेले सर्वात वेगवान वारे आहेत. वैज्ञानिकांच्या मते, जर असे हवामान पृथ्वीवर आले तर ते माणसाचे जगणे जवळजवळ अशक्य करेल. डब्ल्यूएएसपी-127 बी नावाचा हा परग्रह पृथ्वीपासून 500 प्रकाशवर्ष दूर आहे. हा एक महाकाय वायूचा ग्रह आहे, जो गुरूपेक्षा थोडा मोठा, पण कमी वस्तुमानाचा आहे. 2016 मध्ये शोधला गेलेला डब्ल्यूएएसपी-127 बीच्या विषुववृत्तावर जोरदार वार्‍यांचा एक मोठा पट्टा आहे, जो आपल्या सौरमंडळातील वायू ग्रहांवर दिसणार्‍या पट्ट्यांसारखा आहे.

अलीकडेपर्यंत या वार्‍यांचा वेग एक रहस्य होते. 211 जानेवारी रोजी ‘एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात वार्‍यांचा वेग उघड झाला. चिलीमध्ये असलेल्या युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या वेरी लार्ज टेलिस्कोपचा वापर करून वैज्ञानिकांनी या वार्‍यांचा वेग मोजला. जर्मनीच्या गॉटिंगेन विद्यापीठातील खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि अभ्यासाच्या मुख्य लेखिका लिसा नॉर्टमन म्हणाले, “ग्रहाचा काही भाग अत्यंत वेगाने आपल्या दिशेने सरकत आहे, तर दुसरा भाग त्याच वेगाने दूर जात आहे. हे ग्रहाच्या विषुववृत्तावर अतिशय वेगवान जेट स्ट्रीमची उपस्थिती दर्शवते.” डब्ल्यूएएसपी-127 बी वरील वारे 9 किलोमीटर प्रति सेकंद या आश्चर्यकारक वेगाने वाहतात, जो कॅटेगरी 5 च्या चक्रीवादळाच्या वेगापेक्षा 130 पट जास्त आहे.

नासानुसार, हे वारे नेपच्यूनवरील जेट स्ट्रीमपेक्षा अंदाजे 18 पट जास्त वेगवान आहेत, जे ताशी 1800 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात, ज्यामुळे ते आपल्या सौरमंडळातील सर्वात वेगवान वारे ठरतात. डब्ल्यूएएसपी-127 बी च्या वातावरणातून जाणार्‍या प्रकाशाचे विश्लेषण करून, संशोधकांनी त्याच्या ढगांची रचना निश्चित केली, ज्यामध्ये पाण्याच्या वाफेबरोबर कार्बन डायऑक्साइड वायू देखील मिसळलेला आढळला. जरी ही संयुगे पृथ्वीवरील जीवनाशी संबंधित असली, तरी ग्रहाची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्याला राहण्यायोग्य बनवते. व्हीएलटीद्वारे गोळा केलेल्या तापमान डेटानुसार, डब्ल्यूएएसपी-127 बी चे ध—ुवीय प्रदेश ग्रहाच्या इतर भागांपेक्षा थंड आहेत, त्याच्या दिवस आणि रात्रीच्या तापमानात फक्त थोडासा फरक आहे. सध्या,व्हीएलटीसारख्या केवळ जमिनीवर आधारित दुर्बिणीच अशा दूरच्या ग्रहांवरील वार्‍यांचा वेग मोजू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT