वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि अत्यंत आकर्षक असा २D (द्विमितीय) नकाशा प्रसिद्ध केला आहे. एका दशकाहून अधिक काळ केलेल्या निरीक्षणांमधून हा नवा नकाशा तयार करण्यात आला असून, यामध्ये ब्रह्मांडामधील सुमारे ४ अब्ज तारे, आकाशगंगा, कृष्णविवरे, लघुग्रह आणि इतर महत्त्वाच्या खगोलीय घटकांची सविस्तर नोंद घेण्यात आली आहे. हा नकाशा रात्रीच्या आकाशाचा तब्बल तीन-चतुर्थांश भाग हाय-रिझोल्यूशनमध्ये दाखवतो. यात दृश्यमान प्रकाश आणि इन्फ्रारेड तरंगलांबीच्या मदतीने धुळीच्या किंवा वायूच्या ढगांमुळे न झाकलेला विश्वाचा मोठा भाग चित्रित करण्यात आला आहे. हा नकाशा आकारमानाने इतका विशाल आहे की, तो एकाच प्रतिमेमध्ये दाखवणे अशक्य आहे; म्हणूनच खगोलशास्त्रज्ञांनी सर्वसामान्यांना आणि संशोधकांना ‘Legacy Survey Sky Browser’ या मोफत वेबपेजचा वापर करून विश्वाचे हे रूप ‘एक्सप्लोर’ करण्याचे आवाहन केले आहे.
या नकाशासाठी माहिती गोळा करण्यासाठी १३ वर्षे लागली असून, यात ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन’ (NSF) आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोना’च्या दुर्बिणींचा वापर करून जमिनीवर आधारित तीन मोठ्या आकाश सर्वेक्षणांची मदत घेण्यात आली. ही सर्व माहिती आता इतर वैज्ञानिक संशोधकांसाठी खुली करण्यात आली असून, यामुळे भविष्यातील दुर्बिणींना अंतराळ संशोधनात मोठी मदत होणार आहे. 'खगोलशास्त्रज्ञ आणि नागरिक-वैज्ञानिक आपल्या विश्वाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या नकाशाचा वापर स्वतःच्या निरीक्षणांसोबत करू शकतात,' असे ‘NOIRLab’ च्या NSF अधिकाऱ्यांनी १० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे असेही नमूद केले आहे की, 'संशोधक याद्वारे ‘गुरुत्वीय भिंगासारख्या’ दुर्मीळ घटनांचा शोध घेऊ शकतात, ‘सुपरनोव्हा’सारख्या अल्पकालीन घटनांचे निरीक्षण करू शकतात आणि भौतिकशास्त्रातील या दोन सर्वात मोठ्या रहस्यांचा तपास करू शकतात : ‘डार्क मॅटर’ जो विश्वातील बहुतांश वस्तुमानासाठी कारणीभूत असलेला अदृश्य घटक आहे आणि ‘डार्क एनर्जी’ जे बल आपल्या विश्वाच्या वेगाने होणाऱ्या विस्ताराला चालना देत आहे.'