विश्वसंचार

मंगळावरही दही खाऊ शकतील अंतराळवीर!

Arun Patil

वॉशिंग्टन : माणूस मंगळावर कधी जाणार हे स्पष्टपणे सांगता येणे कठीण आहे. मात्र मंगळावर मानवी वसाहतही स्थापन करण्याची स्वप्ने पाहिली जात आहेत. अर्थात माणसाच्या मंगळ प्रवासाबाबत जगभरातील खासगी व सरकारी अंतराळ संशोधन संस्था नवे नवे प्रयोग, संशोधने करत आहेत.

आता एका नव्या संशोधनातून माणूस मंगळावरही तसेच मंगळापर्यंतच्या अंतराळ प्रवासातही दही खाऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेत याबाबतचे प्रयोग करण्यात आले आहेत. त्यानुसार बल्गेरियन दही मंगळ मोहिमेवेळी अंतराळवीरांना उपयुक्त ठरू शकते.

एका रिपोर्टमध्ये बल्गेरियन दह्याचे काही लाभ आणि काही तोटेही सांगिलेले आहेत. हा रिपोर्ट जर्नल ऑफ एथनिक फूडस् या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनात दह्यासारख्या पोटासाठी गुणकारी खाद्यपदार्थांचे नियमित उत्पादन आणि वापर याची माहिती दिली आहे. वैज्ञानिकांनी आपला प्रयोग मंगळ ग्रहासारख्या वातावरणात केला. त्यांनी उटाहमध्ये मार्स डेझर्ट रिसर्च स्टेशनमध्ये हे प्रयोग केले.

प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांनी दोन आठवडे एनालॉग मोहिमेत सहभाग घेतला आणि या काळात बल्गेरियन दही खाल्ले. हे दही सहजपणे बनवता येते आणि त्याचा संपूर्ण आरोग्य, विशेषतः पोटाच्या आरोग्यासाठी चांगला लाभ होतो. मंगळापर्यंत जाण्यासाठी दीर्घकाळाचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे अशा काळात अंतराळवीरांसाठी दह्याचा आहार योग्य ठरणार नाही असे आतापर्यंत मानले जात होते. मात्र आता या नव्या संशोधनाने दह्याचाही या प्रवासात तसेच मंगळ ग्रहावर वापर होऊ शकेल, असे दाखवले आहे.

SCROLL FOR NEXT