वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या इतिहासात १९६५ मध्ये घडलेली एक रंजक घटना अंतराळ विश्वात आजही चर्चेचा विषय ठरते. ‘जेमिनी ३’ या मोहिमेदरम्यान अंतराळवीर जॉन यंग यांनी आपल्या प्रेशर सूटच्या खिशात चोरून एक सँडविच नेले होते. शून्य गुरुत्वाकर्षणात या सँडविचचा एक तुकडा खाताच त्याचे बारीक कण अंतराळात हवेत पसरले आणि यामुळे मोहिमेतील यंत्रणा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकारानंतर नासाच्या प्रशासनाने थेट शिस्तभंगाच्या कारवाईबाबत अहवाल मागवला होता; मात्र मिशन प्रमुखांच्या भूमिकेमुळे यंग यांच्यावरील मोठी कारवाई टळली.
‘स्पेस डेली’च्या वृत्तानुसार, १९६५ मधील ‘जेमिनी ३’ मोहिमेतील या सँडविच प्रकरणाचे पडसाद थेट अमेरिकी काँग्रेसच्या बजेट सुनावणीत उमटले. नासाचे प्रशासक जेम्स वेब यांनी जॉन यंग यांच्या या वागणुकीला ‘अयोग्य वर्तन’ ठरवले होते. त्यांनी ‘मॅन्ड स्पेसक्राफ्ट सेंटर’चे संचालक रॉबर्ट गिलरुथ यांच्याकडे या प्रकरणी यंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी का, याबाबत अहवाल मागितला होता. नासाच्या इतिहासकार जेनिफर रॉस-नझल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च १९६५ रोजी अंतराळ मोहिमेसाठी लाँचपॅडकडे जात असताना जॉन यंग यांनी बॅकअप पायलट वॉल्टर शिरा यांच्याकडून हे ‘कॉर्नड बीफ सँडविच’ मागवून घेतले आणि गुपचूप आपल्या प्रेशर सूटच्या खिशात भरले.
नासा एम्सचे इतिहासकार जेम्स अँडरसन यांच्या नोंदीनुसार, सुमारे पाच तासांच्या या अंतराळ प्रवासात दोन तास उलटल्यानंतर यंग यांनी ते सँडविच मोहिमेचे कमांडर गस ग्रिसम यांना दिले. ग्रिसम यांनी त्याचा एक घास घेतला खरा, पण लगेचच ब्रेडचे बारीक तुकडे हवेत तरंगू लागले. हे तुकडे अत्याधुनिक उपकरणांच्या पॅनलमध्ये जाऊन अडकल्यास बिघाड होण्याचा मोठा धोका होता. त्यामुळे त्यांनी लगेचच ते सँडविच पुन्हा खिशात ठेवून दिले. ही सर्व घटना एका मिनिटापेक्षाही कमी वेळात घडली. बजेट सुनावणीदरम्यान खासदार जॉर्ज ई. शिपली यांनी जेमिनी अंतराळयानाच्या केबिनची तुलना ‘शस्त्रक्रिया कक्षा’शी केली. अन्नाचे बारीक कण उपकरणांच्या पॅनलमागे गेल्यास संपूर्ण मोहिमेला आणि चालकदलाला मोठा धोका निर्माण होऊ शकला असता, असे सांगत त्यांनी या कृतीवर कडक ताशेरे ओढले.
यावर जेम्स वेब यांनी स्पष्ट केले की, उड्डाणादरम्यान काय न्यायचे हे ठरवण्याचा अधिकार वैयक्तिक अंतराळवीराला दिला जाऊ शकत नाही. मानव अंतराळ उड्डाण विभागाचे जॉर्ज मुलर यांनी समितीला सांगितले की, या सँडविचमुळे मोहिमेच्या मूळ उद्दिष्टांवर किंवा प्रयोगांवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. भविष्यात अशा वस्तू नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. संचालक रॉबर्ट गिलरुथ यांनी चालकदलाचा ठाम बचाव करत सांगितले की, मोहिमेदरम्यानचा ताण कमी करण्यासाठी अंतराळवीर अशा गोष्टी करतात. ज्यांच्या खांद्यावर देशाची एवढी मोठी जबाबदारी आहे, त्यांच्यासाठी अतिशय कठोर नियम बनवणे योग्य ठरणार नाही. अखेर गिलरुथ यांच्या भूमिकेमुळे जॉन यंग यांच्यावर कोणतीही औपचारिक कारवाई झाली नाही.