Near Earth asteroid | निळ्या देवमाशाइतका लघुग्रह गेला पृथ्वीजवळून 
विश्वसंचार

Near Earth asteroid | निळ्या देवमाशाइतका लघुग्रह गेला पृथ्वीजवळून

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मोठा आणि यापूर्वी कधीही न पाहिलेला लघुग्रह सुमारे 20,000 मैल प्रतितास (32,000 कि.मी./तास) वेगाने पृथ्वीच्या दिशेने झेपावत आला. सोमवारी (18 मे) हा लघुग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळून गेला की, काही कृत्रिम उपग्रहही त्याच्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत. या लघुग्रहाचा आकार निळ्या देवमाशाइतका होता.

या लघुग्रहाला ‘2026 JH2’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना येथील ‘माऊंट लेमन ऑब्झर्व्हेटरी’मधील खगोलशास्त्रज्ञांनी 10 मे रोजी याचा शोध लावला. याच वेधशाळेने गेल्या वर्षी अत्यंत तेजस्वी ‘लेमन धूमकेतू’ शोधला होता. ‘नासा’च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या डेटाबेसनुसार, हा अंतराळातील खडक लंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती दर 3.7 वर्षांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि प्रवासादरम्यान तो गुरू ग्रहाइतका दूर जातो. ‘2026 JH2’ या लघुग्रहाचा व्यास सुमारे 115 फूट (35 मीटर) आहे, जो पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी असलेल्या ‘ब्लू व्हेल’च्या कमाल लांबीपेक्षा थोडा जास्त आहे.

आकाराच्या बाबतीत हा लघुग्रह 2013 मध्ये रशियाच्या आकाशात कडकडत फुटलेल्या प्रसिद्ध ‘चेल्याबिन्स्क उल्के’च्या तोडीचा आहे. गेल्या 120 वर्षांत पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केलेला चेल्याबिन्स्क हा सर्वात मोठा अंतराळातील खडक होता. भारतीय वेळेनुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर, हा लघुग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 56,000 मैल (91,000 किलोमीटर) अंतरावरून पुढे निघून गेला. हे अंतर पृथ्वी आणि चंद्राच्या एकूण अंतराच्या केवळ एक चतुर्थांश (1/4) भाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT