वॉशिंग्टन : सध्या खगोलशास्त्रज्ञ दशकांतून एकदा होणार्या एका दुर्लभ खगोलीय घटनेचे निरीक्षण करीत आहेत. एखाद्या डोंगराइतका मोठा लघुग्रह सध्या पृथ्वीजवळून पुढे जात आहे. या आठवड्याच्या अखेरीस या लघुग्रहाची चमक सर्वाधिक असेल. त्यामुळे त्याला घरगुती दुर्बिणीनेही पाहता येऊ शकेल. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या म्हणण्यानुसार, ‘887 एलिंडा’ नावाचा हा विशाल लघुग्रह अमेरिकेतील मॅनहॅटन शहराइतका आहे. ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीनुसार, या लघुग्रहाची रुंदी 4.2 किलोमीटर आहे.
बुधवार, 8 जानेवारीला हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात कमी अंतरावर म्हणजे 1.23 कोटी किलोमीटरवर आला होता. हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यादरम्यानच्या अंतराच्या 32 पट अधिक आहे. एलिंडा आता सन 2087 पर्यंत पृथ्वीजवळ येणार नाही. इतक्या मोठ्या आकाराचा लघुग्रह जर पृथ्वीला धडकला तर मोठाच विध्वंस होऊ शकतो. अर्थात, तसे काही घडण्याची भीती सध्या तरी नाही. या लघुग्रहाची चमक 12 जानेवारीला म्हणजे रविवारी सर्वाधिक असेल असे ‘नासा’च्या संशोधकांनी म्हटले आहे. इटलीचे खगोलशास्त्रज्ञ जियानलुका मासी यांनी म्हटले आहे की, केवळ उघड्या डोळ्यांनी तो पाहता येणे शक्य नाही. त्यासाठी एंट्री लेव्हल स्टारगेजिंग दुर्बिण किंवा एखादा चांगला बॅकयार्ड टेलिस्कोप हवा. स्कायवॉचिंग रिपोर्टर जेमी कार्टर यांनी म्हटले आहे की, एलिंडा लघुग्रह मिथुन राशीमधून जात असताना दिसेल. उत्तर गोलार्धात तो आकाशात चमकत असताना रात्रभर दिसेल.