शिकागो : वैज्ञानिकांनी अत्यंत सूक्ष्म असे कृत्रिम न्यूरॉन्स तयार करण्यात यश मिळवले आहे, जे प्रत्यक्ष जिवंत मेंदूच्या पेशींशी संवाद साधू शकतात. उंदराच्या मेंदूतील पेशींवर केलेल्या या प्रयोगामुळे भविष्यात मेंदूचे विकार आणि संगणकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘नेचर नॅनोटेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात 15 एप्रिल रोजी हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनाचा मुख्य उद्देश मेंदूच्या कार्यप्रणालीची हुबेहूब नक्कल करणारे संगणक तयार करणे हा आहे. आजची ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) यंत्रणा प्रचंड वीज वापरते. मात्र, मेंदूच्या रचनेवर आधारित ‘न्युरोमॉर्फिक कॉम्प्युटर्स’ विकसित झाल्यास, डेटावर प्रक्रिया करणे अधिक ऊर्जा-कार्यक्षम (Energy- efficient) होईल. ‘आम्ही शक्य तितक्या विश्वासार्हतेने मेंदूची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहोत.
पारंपरिक डिजिटल संगणकाला पर्याय शोधणे, जेणेकरून मोठ्या डेटावर कमी ऊर्जेत प्रक्रिया करता येईल, ही आमची मुख्य प्रेरणा आहे.’ असे मार्क हर्सम, प्राध्यापक, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी यांनी सांगितले. कृत्रिम न्यूरॉन्सच्या या विकासामुळे अनेक क्षेत्रांत बदल होऊ शकतात : ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस : मेंदूच्या लहरींद्वारे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कृत्रिम अवयव (Prosthetic limbs) किंवा दळणवळण साधने नियंत्रित करणे अधिक सोपे होईल. मेंदूच्या आजारांवर उपचार : अल्झायमरसारख्या गंभीर आजारांमध्ये नष्ट झालेल्या मज्जासंस्थेच्या पेशींच्या जागी हे कृत्रिम न्यूरॉन्स बसवून मेंदूचे कार्य पुन्हा सुरू करण्याची आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे.
आजचे संगणक सिलिकॉन चिप्सवर चालतात, जे अत्यंत कडक असतात आणि त्यांची रचना बदलता येत नाही. याउलट, आपला मेंदू लवचिक असून, त्यातील पेशींचा एकमेकांशी असलेला संपर्क सतत बदलत असतो (ज्याला ‘प्लॅस्टिकिटी’ म्हणतात). जुन्या संशोधनांमध्ये कृत्रिम न्यूरॉन्ससाठी मऊ जेल किंवा कडक धातूंचे ऑक्साईड वापरले जात असत. मात्र, मऊ पदार्थांचे सिग्नल खूप संथ असायचे, तर कडक पदार्थांचे खूप वेगवान. नवीन तंत्रज्ञानात या दोन्ही मर्यादांवर मात करून मानवी मेंदूच्या नैसर्गिक वेगाशी जुळणारे साहित्य वापरण्यात आले आहे. जरी हा प्रयोग यशस्वी झाला असला, तरी कृत्रिम न्यूरॉन्स मानवी मेंदूत पूर्णपणे मिसळण्यासाठी (Seamless integration) अद्याप बरेच संशोधन होणे बाकी आहे. मेंदूच्या गुंतागुंतीच्या 3डी रचनेशी जुळवून घेणारे तंत्रज्ञान विकसित करणे हे वैज्ञानिकांपुढील मोठे उद्दिष्ट आहे.