Artificial leg found | समुद्रात हरवलेला कृत्रिम पाय 10 महिन्यांनी सापडला 
विश्वसंचार

Artificial leg found | समुद्रात हरवलेला कृत्रिम पाय 10 महिन्यांनी सापडला

पुढारी वृत्तसेवा

ब्रिडलिंग्टन : इंग्लंडच्या समुद्रकिनार्‍यावर पोहायला गेलेल्या एका महिलेचा कृत्रिम पाय लाटांसोबत वाहून गेला होता. ही घटना घडून 10 महिने उलटल्यानंतर, तो पाय तब्बल 14.5 मैल दूर असलेल्या दुसर्‍या एका किनार्‍यावर सुखरूप सापडला आहे. या अजब घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 69 वर्षीय ब्रेंडा ओग्डेन या एप्रिल महिन्यात ब्रिडलिंग्टन येथील समुद्रकिनार्‍यावर आपल्या स्विमिंग ग्रुपसोबत पोहायला गेल्या होत्या. त्यावेळी एका मोठ्या लाटेने त्यांना धडक दिली आणि त्यांचा महागडा कृत्रिम पाय निखळून समुद्रात पडला.

हा पाय खास त्यांच्यासाठी बनवण्यात आला होता, ज्याची किंमत साधारणतः 2,700 डॉलर्स (अंदाजे 2.25 लाख रुपये) पेक्षा जास्त होती. त्यांच्या ग्रुपने पाण्यात पाय शोधण्याचा खूप प्रयत्न केला; पण समुद्राच्या ओहोटीमुळे तो खोल पाण्यात वाहून गेला. तब्बल 10 महिन्यांनंतर, एलिझाबेथ फोर्ब्स नावाच्या एका महिलेला अ‍ॅटविक येथील किनार्‍यावर खडकांमध्ये तो कृत्रिम पाय सापडला. एलिझाबेथ यांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. ही पोस्ट पाहून काही लोकांनी एलिझाबेथ यांच्याशी संपर्क साधला आणि हा पाय ब्रेंडा यांचाच असल्याचे ओळखले. ब्रेंडा ओग्डेन यांना जेव्हा आपला पाय परत मिळणार असल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT