RSV Virus Treatment | सांधेदुखीवरील एक औषध ठरू शकते ‘आरएसव्ही’ विषाणूवर प्रभावी  
विश्वसंचार

RSV Virus Treatment | सांधेदुखीवरील एक औषध ठरू शकते ‘आरएसव्ही’ विषाणूवर प्रभावी

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सांधेदुखीसारख्या आजारांवर उपचारासाठी वापरले जाणारे एक स्वस्त आणि बाजारात सहज उपलब्ध असणारे वेदनाशामक औषध मानवी श्वसनसंस्थेतील ‘आरएसव्ही’ (RSV - Respiratory Syncytial Virus) विषाणूचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या कमी करू शकते, असा दावा एका प्रयोगशाळेतील प्राथमिक संशोधनातून करण्यात आला आहे.

‘आरएसव्ही’ हा श्वसनसंस्थेवर हल्ला करणारा एक धोकादायक विषाणू आहे. अमेरिकेत नवजात बालके रुग्णालयात दाखल होण्यामागे हा विषाणू हे सर्वात मोठे कारण आहे. ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना या विषाणूमुळे गंभीर आजार होण्याचा किंवा मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो. ६५ वर्षांवरील वृद्धांसाठीही हा विषाणू आरोग्याची मोठी समस्या बनतो. सध्या या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गरोदर महिला आणि वृद्धांसाठी लस उपलब्ध आहे, तसेच लहान मुलांसाठी अँटिबॉडी-आधारित औषधे आहेत. मात्र, एकदा संसर्ग झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट अँटिव्हायरल औषध सध्या उपलब्ध नाही.

७ मे रोजी ‘व्हायरस रिसर्च’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळले आहे की, ‘इंडोमेथासिन’ हे सूज कमी करणारे औषध ‘आरएसव्ही’ विषाणूला मानवी पेशींवर हल्ला करण्यापासून आणि शरीरात पसरण्यापासून रोखते. हा विषाणू शरीरात पसरण्यासाठी ज्या मुख्य प्रोटीनचा (प्रथिन) वापर करतो, त्या प्रोटीनच्या कामात हे औषध अडथळा निर्माण करते. त्यामुळे या औषधाचा वापर आरएसव्हीच्या उपचारासाठी होऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे. प्रयोगशाळेतील हे निष्कर्ष आशादायक असले, तरी प्रत्यक्षात रुग्णांवर उपचार करताना याचे निकाल कसे असतील, याबाबत तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ, हे औषध थेट रुग्णांना देण्यापूर्वी त्याच्या मानवी चाचण्या होणे अद्याप बाकी आहे; परंतु या संशोधनाने एका नव्या उपचाराची दारे नक्कीच खुली केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT