Artemis mission delay | स्पेससूट तयार नसल्याने आर्टेमिस मोहिमेला 3 वर्षांचा विलंब शक्य 
विश्वसंचार

Artemis mission delay | स्पेससूट तयार नसल्याने आर्टेमिस मोहिमेला 3 वर्षांचा विलंब शक्य

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘आर्टेमिस’ चांद्र मोहिमेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ‘नासा’चे पुढील पिढीचे स्पेससूट अद्याप तयार झाले नसल्याने, मानवाचे चंद्रावर उतरण्याचे स्वप्न तीन वर्षांहून अधिक काळ लांबणीवर पडू शकते, असा दावा एका ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

नासाच्या ‘ऑफिस ऑफ इन्स्पेक्टर जनरल’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, खासगी कंत्राटदार अ‍ॅक्सिओम स्पेसकडून पुरवले जाणारे स्पेससूट 2031 पर्यंत चाचणीसाठी उपलब्ध होणार नाहीत. नियमानुसार, ‘नासा’ला 2028 मध्ये चंद्रावर मानव पाठवायचे आहेत. मात्र, सूट तयार नसल्याने हे वेळापत्रक कोलमडण्याची भीती आहे. चंद्रावर उतरण्यासाठी नवीन ‘लुनार सूट’ असणे अनिवार्य आहे. अहवालात नमूद केल्यानुसार : अपोलो मोहिमेचे सूट : हे सूट 50 वर्षांहून अधिक जुने असून, ते आता वापरण्यायोग्य नाहीत.

ISS वरील सूट : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सध्या वापरले जाणारे सूटदेखील सुरक्षेच्या कारणास्तव बदलणे आवश्यक आहे. कारण, त्यामध्ये ‘मोठे सुरक्षा धोके’ असल्याचे समोर आले आहे. OIG च्या ऑडिट असिस्टंट डायरेक्टर डियाना ली यांनी सांगितले की, ‘सूट तयार करण्याचे मूळ वेळापत्रक अतिआशावादी आणि अवास्तव होते. प्रत्यक्षात दोन्ही प्रकारचे सूट ठरलेल्या वेळेपेक्षा दीड वर्ष मागे आहेत.’ जर अ‍ॅक्सिओम स्पेस ‘नासा’च्या गरजा वेळेत पूर्ण करू शकले नाही, तर आर्टेमिस मोहिमेच्या तारखांमध्ये मोठा बदल करावा लागेल. सध्या अ‍ॅक्सिओम स्पेस ही ‘नासा’ला स्पेससूट पुरवणारी एकमेव कंपनी आहे.

कंपनीचे सीईओ जोनाथन सर्टेन यांनी सांगितले की, ‘आम्ही या पुनरावलोकनाचे स्वागत करतो. आमचे पूर्ण लक्ष 2028 मध्ये अमेरिकन अंतराळवीरांना सुरक्षितपणे चंद्रावर उतरवण्यासाठी सक्षम स्पेससूट देण्यावर आहे.’ नासाने 2028 मध्ये आर्टेमिस-4 आणि आर्टेमिस-5 या दोन मानवी मोहिमांचे नियोजन केले आहे. आर्टेमिस कार्यक्रम आधीच ठरलेल्या वेळेपेक्षा मागे असून, त्याचा खर्चही बजेटच्या बाहेर गेला आहे. दरम्यान, नासाने ‘आर्टेमिस-2’ मोहिमेद्वारे चंद्राभोवती मानवाचा प्रवास घडवून आणण्याची आपली क्षमता सिद्ध केली असली, तरी प्रत्यक्षात चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी आता ‘स्पेससूट’ हीच सर्वात मोठी अडचण ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT