लंडन : व्यापार युद्ध आणि टॅरिफ वॉरच्या पलीकडे जाऊन जग आता पुन्हा एकदा अंतराळ स्पर्धेच्या युगात प्रविष्ट झाले आहे. यावेळी ही स्पर्धा प्रामुख्याने अमेरिका आणि चीन यांच्यात असून, दोघांची नजर चंद्रावर वर्चस्व गाजवण्यावर आहे. ही स्पर्धा केवळ वैज्ञानिक यशापुरती मर्यादित नसून, यात भू-राजकारण, संसाधने आणि भविष्यातील ऊर्जेचा मोठा खेळ दडला आहे.
अमेरिकन अंतराळ संस्था ’नासा’ आपल्या ’आर्टेमिस’ मोहिमेद्वारे 50 वर्षांनंतर पुन्हा मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे. नुकतीच ’आर्टेमिस-2’ मोहिमेद्वारे चंद्राभोवतीची मानवी मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. आता आगामी वर्षांत ’आर्टेमिस-3’ आणि ’आर्टेमिस-4’ अंतर्गत चंद्रावर लँडिंग आणि कायमस्वरूपी बेस बनवण्याची योजना आहे. अमेरिकेचे उद्दिष्ट केवळ चंद्रावर जाणे नव्हे, तर तिथे दीर्घकाळ राहून भविष्यातील ’मंगळ’ मोहिमेची तयारी करणे हे आहे. चीनदेखील या शर्यतीत मागे नाही. 2030 पर्यंत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे.
अंतराळात आपली तांत्रिक आणि धोरणात्मक ताकद दाखवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. चीनचे लक्ष चंद्रावर कायमस्वरूपी उपस्थिती निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढवणे यावर आहे. जर अमेरिकेच्या मोहिमेला विलंब झाला, तर चीन चंद्रावर आधी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्पेस रेसमध्ये अमेरिका आणि चीन मुख्य खेळाडू असले, तरी भारत एक उगवता तारा म्हणून समोर येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 2040 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर उतरवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम, ‘गगनयान’, 2027 मध्ये प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. स्वतःचे अंतराळ केंद्र (स्पेस स्टेशन) उभारण्याच्या योजनेसह भारताने या मोठ्या उडीची पायाभरणी आधीच सुरू केली आहे. या नव्या स्पेस रेसचे सर्वात मोठे कारण म्हणजे ’हीलियम-3’ . हा एक दुर्मिळ घटक आहे जो पृथ्वीवर अत्यंत कमी, पण चंद्रावर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. भविष्यात हा घटक स्वच्छ आणि शक्तिशाली ऊर्जेचा एक मोठा स्रोत बनू शकतो. याच कारणामुळे चंद्र आता केवळ वैज्ञानिक कुतूहलाचा विषय न राहता ’ऊर्जेचा खजिना’ बनला आहे.