Underwater UFOs | महासागराच्या अथांग पाण्यात लपले आहेत यूएफओ? 
विश्वसंचार

Underwater UFOs | महासागराच्या अथांग पाण्यात लपले आहेत यूएफओ?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : परग्रहवासीयांनी (एलियन) पृथ्वीवर प्रवेश केला असेल, तर ते महासागराच्या अथांग खोलीत लपून राहत असावेत, असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याने केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागर आणि वातावरण प्रशासनाचे (एनओएए) माजी कार्यवाहक प्रशासक आणि निवृत्त रिअर ॲडमिरल टिम गॅलॉडेट यांनी हा दावा केला. दरम्यान, कॅनडाच्या उत्तरेकडील नुनावुत परिसरातील समुद्रात परग्रहवासीयांच्या कथित पाण्याखालील तळाचे प्रवेशद्वार शोधल्याचा दावा यूएफओ संशोधक स्कॉट सी. वॉरिंग यांनी केला आहे.

सीन हॅनिटी यांच्या पॉडकास्टवरील मुलाखतीत बोलताना गॅलॉडेट यांनी महासागर हा परग्रहवासीयांसाठी लपण्याचा योग्य पर्याय असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, आतापर्यंत ड्रोन, तरंगणारी उपकरणे आणि अन्य तंत्रज्ञानाच्या मदतीने पृथ्वीवरील महासागराच्या एकूण घनफळापैकी केवळ १० टक्के भागाचाच अभ्यास झाला आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी अनेक रहस्ये दडलेली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

समुद्रात जाणाऱ्या आणि कोणताही व्यत्यय न निर्माण करता पुन्हा पाण्याबाहेर येणाऱ्या अज्ञात वस्तूंचे व्हिडीओ पाहिल्याचेही गॅलॉडेट यांनी सांगितले. या वस्तू ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करू शकतात; मात्र त्यातून अपेक्षित ध्वनिलहरी निर्माण होत नसल्याचा त्यांचा दावा आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाने अशा हालचालींचे स्पष्टीकरण देणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, यूएफओ संशोधक वॉरिंग यांनी कॅनडाच्या नुनावुत परिसरातील समुद्रात सुमारे तीन हजार फूट रुंदीचे आणि पाण्याच्या पृष्ठभागापासून ३२ फूट खोलीवर असलेले एक छिद्र शोधल्याचा दावा केला आहे. हे परग्रहवासीयांच्या पाण्याखालील तळाचे प्रवेशद्वार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणाची तपासणी करण्यासाठी मानवरहित पाणबुडी किंवा स्वयंचलित ड्रोन पाठवण्याची सूचना त्यांनी केली आहे.

गुप्त तळ असल्याचा आणखी एक दावा

अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याने डेव्हिड ग्रुश यांनीही समुद्राखाली परग्रहवासीयांचा मोठा तळ असल्याचा दावा केला आहे. जो रोगन यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी अशा तळाचे क्षेत्रफळ अनेक शहरांच्या इमारतींच्या समूहाएवढे असल्याचे सांगितले. तेथून अज्ञात यंत्रणा ये-जा करत असल्याचा दावाही त्यांनी केला. ग्रुश यांनी २०२३ मध्ये अमेरिकी काँग्रेससमोर शपथेवर साक्ष देताना सरकारकडे परग्रहवासीयांच्या यानांचे अवशेष मिळवण्याचे आणि त्यांचे तंत्रज्ञान समजून घेण्याचा गुप्त कार्यक्रम असल्याचा आरोप केला होता.

मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध झालेला नाही. यूएफओ किंवा परग्रहावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाची पुष्टी करणारा कोणताही भौतिक पुरावा सापडलेला नसल्याची भूमिका अमेरिकी लष्कर आणि व्हाइट हाऊसने कायम ठेवली आहे. त्यामुळे समुद्राखालील कथित एलियन तळाचे दावे अद्याप संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT