वॉशिंग्टन ः नुकतेच म्हणजे 7 एप्रिल रोजी शास्त्रज्ञांनी एक खळबळजनक घोषणा केली, ‘आम्ही पुन्हा एकदा डायर वुल्व्ह परत आणले आहेत!’ ही घोषणा जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘कोलोसल बायोसायन्सेसने केली असून त्यांनी बर्फासारख्या शुभ— रंगाच्या तीन गोंडस पिल्लांचे फोटो शेअर करत हे ‘जगातील पहिले डी-एक्स्टिंंक्शन’ असल्याचे म्हटले आहे. डायर वुल्व्ह (Aenocyon dirus) हे प्राणी हजारो वर्षांपूर्वी, शेवटच्या हिमयुगाच्या समाप्तीनंतर, नामशेष झाले होते. हेच प्राणी ‘एचबीओ’च्या ‘गेम ऑफ थ—ोन्स’ मालिकेमुळे अधिक प्रसिद्ध झाले होते. ‘कोलोसल’चे सीईओ बेन लॅम यांनी सांगितले की, ‘आम्ही निरोगी डायर वुल्व्ह पिल्ले तयार केली असून, 10,000 वर्षांनंतर हे शिकारी पुन्हा जिवंत केले आहेत.’ पण या दाव्यावर अनेक तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे.
‘कोलोसल’ने तयार केलेले प्राणी हे खरे डायर वुल्व्ह नाहीत, असे डॉ. निक रॉलन्स, न्यूझीलंडमधील ओटॅगो पॅलियोजेनेटिक्स लॅबोरेटरीचे सहसंचालक यांनी म्हटले आहे. ‘हे फक्त ग्रे वुल्व्ह (Canis lupus) आहेत, ज्यामध्ये डायर वुल्व्हसारखी वैशिष्ट्ये कृत्रिमपणे घालण्यात आली आहेत, म्हणजे हे ‘हायब—ीड’ प्राणी आहेत, खरे डायर वुल्व्ह नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. संशोधकांनी दोन प्राचीन डायर वुल्व्ह जीवाश्मांमधून डीएनए मिळवला. पहिला ओहायोमध्ये सापडलेल्या 13,000 वर्षे जुन्या दातातून आणि दुसरा आयडाहोमधील 72,000 वर्ष जुन्या कानाच्या हाडातून. या ‘डीएनए’वर आधारित एक अपूर्ण डायर वुल्व्ह जनुक्रम ( genome) तयार करून, तो विविध सध्या अस्तित्वात असलेल्या नातेवाईक प्राण्यांशी (वुल्व्ह, जॅकल, फॉक्स) तुलना करण्यात आली. त्यानंतर, ग्रे वुल्व्ह या जातीची मादी एग डोनर म्हणून निवडण्यात आली. त्यांच्याच रक्तातून मिळवलेल्या पेशींमध्ये CRISPR या जिन-संपादन तंत्रज्ञानाचा वापर करून 14 जनुकांमध्ये 20 बदल करण्यात आले, जे डायर वुल्व्हच्या प्रमुख गुणधर्मांना कारणीभूत होते. तज्ज्ञांच्या मते, डायर वुल्व्ह आणि ग्रे वुल्व्ह यांच्यात सुमारे 6 दशलक्ष वर्षांपूर्वी विभाजन झाले होते. म्हणजेच ते दोन पूर्णपणे वेगळ्या प्रजाती आहेत. ‘कोलोसल’ने वापरलेल्या ग्रे वुल्व्हच्या अंडपेशी आणि त्यांच्या ‘डीएनए’मध्ये बदल करून तयार केलेले पिल्ले ‘डायर वुल्व्हसारखी दिसणारी’, पण खर्या अर्थाने डायर वुल्व्ह नसलेली आहेत. ‘हे एक प्रकारचे जैविक अनुकरण ( biological mimicry) आहे, पुनर्जीवन नव्हे,’ असं ओटागो विद्यापीठातील प्राणीशास्त्रज्ञ प्रो. फिलिप सेडन यांनी म्हटले आहे.