Sharks Older Than Trees | शार्क खरोखरच झाडांपेक्षाही जुने आहेत का?  
विश्वसंचार

Sharks Older Than Trees | शार्क खरोखरच झाडांपेक्षाही जुने आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

वाशिंग्टन : शार्क हे झाडांपेक्षाही जुने प्राणी आहेत, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. शार्क खरोखरच अत्यंत प्राचीन असून, त्यांचा उत्क्रांतीचा इतिहास शेकडो लाख वर्षांपूर्वीचा आहे; पण ते खरोखरच झाडांच्या आधीपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहेत का? वैज्ञानिकांच्या मते, याचे उत्तर आपण ‘शार्क’ कशाला मानतो यावर अवलंबून आहे.

‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’चे ज्येष्ठ जीवाश्मशास्त्रज्ञ जॉन मेसी यांच्या मते, ‘हा सगळा व्याख्येचा खेळ आहे. माशांच्या प्रजातींमधील शार्कची मूळ वंशावळ ही निश्चितच झाडांपेक्षा जुनी आहे. परंतु, आपण शार्कची व्याख्या कशी करतो, यावर मुख्य उत्तर अवलंबून आहे.’ आपण आज जे आधुनिक शार्क पाहतो, त्यांचा उगम सुमारे १९.५ कोटी (१९५ दशलक्ष) वर्षांपूर्वी ‘ज्युरासिक’ काळात झाला होता. या काळातील प्राचीन शार्कच्या जीवाश्मांचे नाते आजच्या ‘हेक्झांचिफॉर्म्स’ (Hexanchiformes - ६ किंवा ७ कल्ले आणि पाठीवर एकच पख असलेले शार्क) या वंशावळीशी जोडता येते. याचा अर्थ असा की, कमीत कमी आधुनिक शार्क तरी झाडांपेक्षा जुने नाहीत.

वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवर पहिल्या झाडांची उत्क्रांती सुमारे ३८ ते ३९ कोटी वर्षांपूर्वी (मध्य डेव्होनियन काळात) झाली. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या पालेओबॉटनिस्ट सिंडी लोई म्हणाल्या, ‘पहिले झाड कधी आले याबद्दल फारसा वाद नाही.’ उत्क्रांतीच्या नोंदींनुसार ‘आर्किऑप्टेरिस’ (Archaeopteris) हे पृथ्वीवरील पहिले खरोखरचे झाड मानले जाते. न्यूयॉर्कमधील एका ३८.५ कोटी वर्षे जुन्या अश्मीभूत जंगलात याचे जीवाश्म आढळले होते. या झाडाला आजच्या झाडांप्रमाणेच मजबूत लाकडी खोड, पाने आणि खोलवर पसरणारी मुळे होती. परंतु, जेव्हा आपण आधुनिक शार्कच्या नामशेष झालेल्या पूर्वजांचा विचार करतो, तेव्हा चित्र बदलते. आधुनिक शार्कच्या निकटवर्ती पूर्वजांचे जीवाश्म ३५.९ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या (डेव्होनियन काळ) काळात आढळतात. यातील सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे ‘हायबोडाँटस्‌’ (Hybodonts).

या माशांच्या कुर्चामध्ये (Cartilage) असणारी कॅल्शियमची रचना आजच्या शार्कसारखीच होती. वैज्ञानिकांच्या मते, ही वैशिष्ट्यपूर्ण रचना शार्क आणि त्यांच्या पूर्वजांची सर्वात मोठी ओळख आहे. ही व्याख्या ग्राह्य धरल्यास, हे शार्क सुमारे ४० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले-म्हणजेच पहिल्या झाडाच्या आधी! इतकेच नाही, तर शार्कच्या त्वचेवर असणारे दातांसारखे खवले (Dermal denticles) सुमारे ४५ कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांमध्ये आढळले आहेत. याचा निष्कर्ष काय? ज्या काळात माशांचे रूपांतर शार्क सदृश प्राण्यांमध्ये होत होते, त्या संक्रमण काळातील जीवाश्मांमुळे शार्कच्या अचूक व्याख्येबद्दल तज्ज्ञांमध्ये अस्पष्टता निर्माण होते. सोप्या भाषेत सांगायचे, तर आजच्या स्वरूपातील आधुनिक शार्क (१९.५ कोटी वर्षे) हे झाडांपेक्षा (३८.५ कोटी वर्षे) तरुण आहेत; परंतु शार्कच्या पूर्वजांची मूळ वंशावळ (४० ते ४५ कोटी वर्षे) मात्र वनस्पती आणि झाडांपेक्षाही खूप जुनी आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT