वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी पर्यावरणविषयक संस्था असलेल्या आययूसीएनने शुक्रवारी जारी केलेल्या धोका असलेल्या प्रजातींच्या नवीन यादीनुसार, आर्क्टिक सील आणि पक्षी प्रामुख्याने हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आले आहेत. आययूसीएनने म्हटले आहे की, पक्ष्यांसाठीचा धोका जंगलतोड आणि शेतीवाडी वाढल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचा र्हास होण्यात आहे. तर सीलना मुख्यत्वे जागतिक तापमानवाढ आणि समुद्री वाहतूक यांसारख्या मानवी क्रियाकलापांमुळे अधिक धोका आहे.
हुडेड सीलची स्थिती ‘संवेदनशील’वरून बदलून आता ‘संकटग्रस्त’ करण्यात आली आहे. या संस्थेच्या महासंचालक ग्रॅथेल एगुइलर यांनी अबू धाबी येथे झालेल्या विश्व संरक्षण परिषदेत पत्रकारांना सांगितले, ‘हे नवीन जागतिक अपडेट स्पष्टपणे दर्शवते की मानवी गतिविधींचा निसर्गावर आणि हवामानावर किती वाईट परिणाम होत आहे.’ आययूसीएनच्या निवेदनानुसार, त्यांच्या रेड लिस्टमध्ये आता एकूण 1,72,620 प्रजाती समाविष्ट आहेत, त्यापैकी 48,646 प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जगाच्या थंड भागांमध्ये राहणार्या सीलसारख्या प्राण्यांसाठी मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत आहेत.
समुद्री जहाजांची ये-जा, खाणकाम, तेल काढणे, मोठ्या प्रमाणावर मासेमारी आणि शिकार करणे हेदेखील या प्रजातींसाठी इतर धोके आहेत. आययूसीएनने सांगितले की, आर्क्टिक प्रदेशात जागतिक तापमानवाढ इतर ठिकाणांपेक्षा 4 पट वेगाने होत आहे, ज्यामुळे समुद्री बर्फाचे प्रमाण आणि राहण्याचा कालावधी यात मोठी घट झाली आहे. सील अन्नसाखळीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मासे आणि अपृष्ठवंशी प्राणी खातात आणि पोषक तत्त्वांना पुन्हा वातावरणात मिसळतात. ते त्यांच्या संपूर्ण परिसंस्थेतील मुख्य प्रजातींपैकी एक आहेत. नॉर्वेजियन पोलर इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक किट कोवाक्स यांनी स्वालबार्ड द्वीपसमूहाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या, ‘जेव्हा मी या द्वीपसमूहात राहायची, तेव्हा आमच्या काही भागांमध्ये 5 महिन्यांपर्यंत समुद्री बर्फ गोठलेला असायचा, जो आता हिवाळ्यात बर्फमुक्त झाला आहे.’ आर्किटिक किती वेगाने बदलत आहे हे सांगणे खूप कठीण आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. आययूसीएनने सांगितले की, पक्ष्यांच्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट केलेला डेटा हा त्यांच्या वैज्ञानिकांच्या 9 वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे. आययूसीएनने म्हटले की, एकूण पक्षी प्रजातींच्या लोकसंख्येत 61 टक्के घट झाली आहे, जी संख्या 2016 मध्ये 44 टक्के होती, आता ती वाढली आहे. त्यांनी जगभरातील हजारो पक्षी प्रजातींचा अभ्यास केला आणि त्यांना आढळले की 11,185 प्रजातींपैकी 1,256 प्रजाती संपूर्ण जगात संकटग्रस्त आहेत.