विश्वसंचार

इजिप्तमध्ये सोन्याच्या दोन जीभांचा शोध

Arun Patil

कैरो : इजिप्तमधील पुरातत्त्व संशोधकांनी सोन्याची जीभ लावलेल्या दोन ममींचा शोध घेतला आहे. ऑक्सीर्‍हींचस नावाच्या प्राचीन शहरात या ममी सापडल्या. यापूर्वीही ममीच्या तोंडात सोन्याची जीभ ठेवलेले प्रकार आढळले होते. त्यामुळे आता या नव्या दोन जीभांच्या शोधांमुळे अशा सोन्याच्या जीभांची एकूण संख्या 16 झाली आहे.

रोमन काळात म्हणजेच इसवी सन पूर्व 29 ते इसवी सन 641 या काळात इजिप्शियन लोक काही व्यक्तींच्या ममीमध्ये अशी सोन्याची जीभ तोंडात ठेवत असत. मृत्यूनंतरच्या जीवनात या जीभेच्या सहाय्याने ते बोलू शकतील, असा त्यांचा समज होता. सोन्याला ते 'देवांचे मांस' मानत असत. त्यामुळे सोन्याची जीभ तयार करून ती मृत व्यक्तीच्या ममी बनवलेल्या मृतदेहातील तोंडात ठेवत असत. यामुळे संबंधित व्यक्ती पाताळातील ओसिरिस या देवाशी बोलू शकेल, अशी त्यांची धारणा होती.

ऑक्सीर्‍हींचस येथेच 2021 मध्ये संशोधकांच्या याच टीमला सोन्याच्या तीन जीभा सापडल्या होत्या. हे शहर सध्याच्या अल-बहनासा शहराजवळ आहे. सोन्याची जीभ असलेल्या ममी रोमन काळातील दोन मकबर्‍यांमध्ये सापडलेल्या आहेत.

SCROLL FOR NEXT