लंडन : ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘एआय’ हे आता लोकांच्या दैनंदिन जीवनातही आलेले आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अनेक गोष्टी थोड्या सोप्या होत आहेत. एका तरुणाने ‘एआय’च्या साहाय्याने झोपेत नोकरीसाठी अप्लाय केलं. तेही एक दोन ठिकाणी नाही तर 1000 नोकर्यांसाठी. सकाळी जे घडलं ते अतिशय धक्कादायक होते. त्याला 50 ठिकाणांहून इंटरव्ह्यूसाठी कॉल आले!
गेल्या काही दिवसांपासून ‘एआय’चं जाळ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. नोकरी शोधण्यापासून ते अगदी नोकरीसाठी अर्ज, पत्र लिहिण्यापर्यंत सगळ्याच बाबतीत ‘एआय’ मदत करत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने एआयची मदत घेऊन रात्रभरात तब्बल 1000 नोकर्यांवर अर्ज केले. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार झोपेत घडला! पण याचा परिणाम जो झाला, त्याने त्या तरुणासकट कुटुंबीयांचीही झोप उडाली! सकाळी हा मुलगा उठला तेव्हा तो अक्षरशः चकित झाला. त्याला चक्क 50 हून अधिक कंपन्यांमध्ये मुलाखतीचे फोन आले. एका प्लॅटफॉर्मवर आपली व्यथा मांडताना त्या माणसाने सांगितले की, त्याने स्वतः तयार केलेल्या एआय बॉटचा यासाठी वापर केला. त्यामध्ये नोकरीच्या उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण केले जाते. तो नोकरीचे वर्णन वाचतो, प्रत्येक नोकरीसाठी स्वतंत्र सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करण्यात आलं आणि कंपनीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. ‘मी गाढ झोपेत असताना माझा बॉट रात्रभर काम करत होता आणि या प्रक्रियेमुळे मला सुमारे 50 मुलाखतीचे कॉल येण्यास मदत झाली,’ असे त्या व्यक्तीने लिहिले. व्यक्तीचा एआय बॉट पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि तो नोकरीच्या वर्णनावर आधारित कस्टमाइज्ड सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करतो. यामुळे केवळ स्वयंचलित स्क्रीनिंग सिस्टीम पास करणे सोपे झाले नाही, तर मानवी भरती व्यवस्थापकांचे लक्षदेखील वेधून घेतले.