Electricity Generating Sticker | स्टिकर लावा अन् वीज मिळवा! 
विश्वसंचार

Electricity Generating Sticker | स्टिकर लावा अन् वीज मिळवा!

स्टिकरप्रमाणे चिकटणारे अनोखे सोलर पॅनल तयार!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जर तुम्ही सोलर पॅनल एखाद्या स्टिकरप्रमाणे कुठेही चिकटवून वीज तयार करू शकलात तर? अमेरिकेतील एका कंपनीने ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ‘सोलर विंडो टेक्नॉलॉजी’ (Solar Window Technologies) या कंपनीने ‘ElectroFlex’ नावाचे एक अत्यंत पातळ आणि लवचीक सोलर उत्पादन लाँच केले आहे. काचेची भलीमोठी फ्रेम किंवा लोखंडी स्ट्रक्चरची अजिबात गरज न भासता, हे स्टिकर कोणत्याही पृष्ठभागावर सहज चिकटवून वीज निर्माण करता येणे हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

‘ElectroFlex’ला आपण एक अत्यंत पातळ आणि हलका सोलर पॅनल मानू शकता, ज्याची जाडी अवघी ०.८५ मि.मी. आहे. स्टिकरसारखे दिसणारे हे सोलर पॅनल ५-लेयर कम्पोजिट लॅमिनेटपासून तयार करण्यात आले आहे. यामध्ये ०.१० मि.मी. फ्रंट एनकॅप्सुलंट, ०.१६ मि.मी. हाय-इफिशिएन्सी सोलर सेल्स, ०.०४ मि.मी. कॉपर सेल बॅकिंग, ०.३० मि.मी. कम्पोजिट लॅमिनेट आणि ०.२५ मि.मी. रिअर सबस्ट्रेटचा समावेश आहे. अत्यंत पातळ असूनही ग्राहकांच्या गरजेनुसार याचे आकारमान आणि रंग बदलता येऊ शकतात, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य.

अनेकदा नेहमीच्या सोलर पॅनल्सच्या कार्यक्षमतेबाबत तक्रारी असतात. मात्र, इलेक्ट्रो फ्लेक्समध्ये ‘इंटरडिजिटेटेड बॅक-कॉन्टॅक्ट सेल्स’ या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे तंत्रज्ञान २४.४ टक्क्यांची पॉवर कन्व्हर्जन कार्यक्षमता देते. लवचीक सोलर पॅनल्सच्या दृष्टीने ही कार्यक्षमता अत्यंत उत्तम मानली जाते. या इलेक्ट्रो फ्लेक्ससाठी कोणत्याही जड फ्रेम किंवा सपोर्ट स्ट्रक्चरची गरज नसल्याने याचा वापर विविध ठिकाणी केला जाऊ शकतो : १) व्यावसायिक ट्रक्स आणि ट्रेनच्या वळणदार/बेंड असलेल्या छत्र्यांवर. २) ड्रोन्स, विमानांची रचना, बोटी आणि जहाजांवर. ३) डेटा सेंटर्स, इमारतींच्या छत्र्या आणि कृषी क्षेत्रात. ४) याशिवाय घरांमध्येही याचा वापर करणे शक्य आहे.

सोलर विंडो कंपनी या इलेक्ट्रो फ्लेक्स सेटअपसोबत फक्त सोलर शीटच नव्हे, तर सिस्‍टीमशी जोडण्यासाठी लागणारे आवश्यक वायरिंग, हार्नेस, इलेक्ट्रिकल सिस्‍टीम आणि पॉवर-बॅलन्सिंग घटकदेखील पुरवत आहे. सध्या ही कंपनी आपले हे उत्पादन अमेरिकेतील ‘टियर-१ OEMs’ (मूळ उपकरण उत्पादक) कंपन्यांना उपलब्ध करून देत आहे. येत्या काळात आशियातील निवडक बाजारपेठांमध्येही याचा विस्तार केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT