नवी दिल्ली : आपल्या देशातील अगदी लहान वयाच्या मुला-मुलींनीही जगभरात कर्तृत्वाचा डंका वाजवला आहे. आता एका अकरा वर्षे वयाच्या मुलीने डोळ्यांशी संबंधित आजारांचे वेळेतच निदान करण्यासाठी एक विशिष्ट अॅप विकसित केले आहे. त्यासाठी तिने 'एआय' म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेतला. योग्य वेळी निदान न झाल्याने बहुतांश रुग्णांची द़ृष्टी जाते. ही समस्या ओळखून लीना रफीक या 11 वर्षांच्या मुलीने डोळ्यांच्या आजारांचे निदान करणार्या हे अॅप बनवले आहे.
लीना सध्या दुबईमध्ये राहते. तिचा जन्म केरळमध्ये झाला होता. तिने 'ओग्लर आयस्कॅन' हे अॅप तयार केले आहे. यामध्ये एका विशिष्ट स्कॅनिंग प्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. याच्या मदतीने डोळ्यांच्या स्थितीबाबत माहिती मिळवता येते. त्यासह आर्कस, मेलानोमा, टेरिजियम आणि कॅटॅरॅक्टसारख्या काही डोळ्यांच्या आजारांचे निदानदेखील करता येते. या अॅपचे निदान 70 टक्के अचूक आहे, अशी माहिती समोर आली आहे.