Hospital antiseptic bacteria |रुग्णालयातील ‘अँटिसेप्टिक’मुळे बॅक्टेरिया होताहेत अधिक शक्तिशाली 
विश्वसंचार

Hospital antiseptic bacteria |रुग्णालयातील ‘अँटिसेप्टिक’मुळे बॅक्टेरिया होताहेत अधिक शक्तिशाली

संशोधकांचा धोक्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : रुग्णालयांमध्ये रुग्णांची त्वचा आणि पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे सामान्य ‘अँटिसेप्टिक’ बॅक्टेरियांना अधिक शक्तिशाली बनवत असल्याचे एका खळबळजनक संशोधनातून समोर आले आहे. स्वच्छतेसाठी वापरलेली ही रसायने तासन्तास पृष्ठभागावर तशीच राहतात, ज्यामुळे बॅक्टेरियांना या रसायनांविरुद्ध लढण्याची सवय होते आणि कालांतराने ते ‘ड्रग-रेझिस्टंट’ (औषधांना दाद न देणारे) बनतात.

2 एप्रिल रोजी ‘एन्व्हायर्न्मेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, बॅक्टेरिया जेव्हा या रसायनांच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्यात ‘टॉलरन्स’ (सहनशक्ती) विकसित होते.

‘सहनशक्ती’ आणि ’प्रतिकारकशक्ती’मधील फरक

सहनशक्ती (ढेश्रशीरपलश) : जेव्हा बॅक्टेरिया रसायनांच्या विशिष्ट प्रमाणात जिवंत राहण्यास शिकतात, तेव्हा त्याला सहनशक्ती म्हणतात. मात्र, स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्‍या मोठ्या डोसमध्ये ते मरू शकतात. यामध्ये अल्कोहोल, आयोडिन किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडसारख्या रसायनांचा समावेश होतो. प्रतिकारकशक्ती (ठशीळीींरपलश) : ही अधिक चिंतेची बाब आहे. यामध्ये बॅक्टेरिया इतके शक्तिशाली होतात की, त्यांना मारण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रसायनांच्या डोसचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि ते उलट वेगाने वाढू लागतात.

अँटिबायोटिक्सवरही होणार परिणाम

संशोधनात असे दिसून आले आहे की, अँटिसेप्टिकच्या सौम्य अंशांशी लढा देताना बॅक्टेरिया एकमेकांसोबत स्वतःच्या ‘डीएनए’चे काही भाग बदलतात. धक्कादायक म्हणजे, हाच डीएनए त्यांना भविष्यात संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अँटिबायोटिक्स औषधांना चकवा देण्यास मदत करू शकतो. म्हणजेच, पृष्ठभाग स्वच्छ करणारे रसायन अंतिमतः औषधांना निकामी ठरवू शकते.

तज्ज्ञांचे मत

नॉर्थवेस्टर्नच्या मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमधील सिव्हिल अँड एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंगच्या प्राध्यापिका आणि या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका एरिका हार्टमॅन यांनी सांगितले की, ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (रोगाणूंची प्रतिकारकशक्ती) अनेक विविध कारणांमुळे निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला शेतीमध्ये आणि इतर पर्यावरणात रसायनांचा जबाबदार वापर करणे आवश्यक आहे.’

‘स्टुअर्डशिप’ (जबाबदार वापर) म्हणजे काय?

बॅक्टेरियांना स्वतःमध्ये बदल करण्याची संधी मिळू नये, यासाठी अँटिबायोटिक्स आणि अँटिसेप्टिक्सचा वापर अत्यंत मर्यादित आणि गरजेनुसारच करणे म्हणजे ‘स्टुअर्डशिप’ होय. रसायनांचा अतिवापर टाळल्यास आपण भविष्यातील महाभयंकर सुपरबग्सचा धोका रोखू शकतो, असेही या संशोधनात सुचवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT