File Photo
विश्वसंचार

अंटार्क्टिकामध्ये चक्क पिरॅमिडसारखा दिसणारा पर्वत

पुढारी वृत्तसेवा

सिडनी : इजिप्तमधील हजारो वर्षांपूर्वीचे भव्य पिरॅमिडस् जगप्रसिद्ध आहेत. गिझामधील खुफुचा पिरॅमिड पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक इजिप्तला जात असतात. अशाच पिरॅमिडसारखा दिसणारा पर्वत दक्षिण ध्रुवावरील बर्फाळ अशा अंटार्क्टिकामध्ये आहे. बर्फाच्या जणू समुद्रात असलेल्या या पर्वताचे उपग्रहांच्या साहाय्याने घेतलेली छायाचित्रे थक्क करणारी आहेत. मात्र, हा पिरॅमिड कोणत्याही मनुष्याने (आणि एलियननेही) बनवलेला नाही! काळाच्या ओघात धूप किंव झीज होण्याच्या प्रक्रियेने तो बनलेला आहे. त्याचा असा आखीवरेखीव आकार सर्वांनाच थक्क करणारा आहे.

या पिरॅमिडसारख्या पर्वताला अद्याप कोणतेही नाव दिलेले नाही. 2016 पासून हा पर्वत लोकांच्या चर्चेचा विषय बनला. मात्र, त्याच्यापूर्वीच काही संशोधकांना त्याविषयीची माहिती होती. मॅसाच्युसेटस्च्या ड्युडले येथील निकोल्स कॉलेजमधील पर्यावरण विज्ञानाचे प्राध्यापक मौरी पेल्टो यांनी याबाबतची माहिती दिली. या पर्वताच्या दक्षिणेस जवळच संशोधकांचे एक रिसर्च सेंटरही आहे. या परिसराला ‘पॅट्रियॉट हिल्स’ असे म्हटले जाते. तेथून आकाशातून पाहिल्यास या पर्वताचा असा पिरॅमिडसारखा आकार स्पष्ट दिसतो. अंटार्क्टिकामधील या ‘पिरॅमिड’ची उंची सुमारे 4,150 फूट म्हणजेच 1265 मीटर आहे. उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच पर्वत डेनालीपेक्षा ही उंची एक पंचमांश आहे. त्याला चार बाजू आहेत. एल्सवर्थ माऊंटनच्या दक्षिणेस हा पर्वत आहे.

अमेरिकन एव्हिएटर लिंकन एल्सवर्थ यांनी 1935 मध्ये या भागातून उड्डाण करीत असताना तेथील पर्वतशिखरांची ही रांग सर्वप्रथम पाहिली होती. तेथील या पिरॅमिड पर्वताच्या चारही बाजू तासून किंवा कोरीवकाम करून बनवल्यासारख्या दिसतात. मात्र, लाखो वर्षांच्या काळातील झीज होण्याच्या क्रियेने त्या तशा बनलेल्या आहेत. दिवसाच्या वेळी पाणी आणि बर्फामुळे दगडातील काही भेगा भरल्या जातात आणि रात्री त्या गोठल्या जातात. भेगांमधील पाणी गोठले की ते या भेगा मोठ्या करते. त्यामधून तुकडे पडत अशी झीज घडत जाते. या प्रक्रियेला ‘फ्रीज-थॉ इरोजन’ असे म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT