कॅनबेरा ः हाडे गोठवणारी थंडी, बर्फाळ वारे आणि खवळलेला समुद्र... अशा जीवघेण्या परिस्थितीत कोणी समुद्राच्या तळातून चिखल काढण्याचा धोका का पत्करेल? पण एका आंतरराष्ट्रीय संशोधक पथकाने हे धाडस केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, या साहसी संशोधकांनी अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या दुर्गम भागात एक मोहीम राबवली, ज्याचा उद्देश दक्षिण महासागराच्या शतकानुशतके जुन्या वैज्ञानिक रहस्यांचा उलगडा करणे हा आहे. आता जगभरातील शास्त्रज्ञ या मौल्यवान चिखलाच्या नमुन्यांचे विश्लेषण करतील. यातून मानवी हस्तक्षेपामुळे, विशेषतः एका शतकाहून अधिक काळ चाललेल्या व्हेल मासेमारीमुळे, अंटार्क्टिका आणि आपल्या ग्रहावर काय परिणाम झाला, हे समजण्यास मदत होईल.
हे संशोधन महासागर आणि हवामान यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांचा एक भाग आहे. या मोहिमेत संशोधकांनी एका विशेष ‘कोरिंग ड्रिल’चा वापर केला. हे यंत्र एखाद्या मोठ्या सफरचंद कोररप्रमाणे ( apple- corer) काम करते. एका संशोधन जहाजाला जोडून, या ड्रिलच्या मदतीने समुद्रात 500 मीटर खोलीपर्यंत खोदकाम करण्यात आले. या पथकाने द्वीपकल्पाच्या आसपासच्या विविध ठिकाणांहून समुद्राच्या तळातील गाळाचे 40 हून अधिक लांब नमुने गोळा केले आहेत. हा भाग अंटार्क्टिकामधील सागरी जीवसृष्टीसाठी सर्वात समृद्ध मानला जातो. तसेच, मासेमारी, पर्यटन आणि 1980 च्या दशकात बंदी येण्यापूर्वी व्हेलच्या शिकारीसाठी हे एक प्रमुख केंद्र होते.
बार्सिलोना विद्यापीठाच्या प्रमुख संशोधक डॉ. एलिसेन्डा बॅलेस्टे यांनी या चिखलाच्या नमुन्यांना ‘इतिहासाचे पुस्तक’ म्हटले आहे. त्या सांगतात, ‘समुद्रात सध्या काय आहे, पूर्वी काय होते आणि मानवी हस्तक्षेपाचे पुरावे, हे सर्व शतकानुशतके गाळाच्या थरांमध्ये नोंदवले जाते.‘ या थरांचे जतन करून आणि ते किती जुने आहेत हे तपासून, संशोधक अंटार्क्टिक सागरी जीवसृष्टीच्या इतिहासाचे चित्र तयार करू शकतात. जहाजावर आणल्यानंतर हे नमुने गोठवून डॉ. बॅलेस्टे यांच्या बार्सिलोनातील प्रयोगशाळेत नेण्यात आले आहेत. आता या अंटार्क्टिक चिखलाचे तुकडे जगभरातील अनेक शैक्षणिक संस्थांना विश्लेषणासाठी पाठवले जातील. या विश्लेषणातून शास्त्रज्ञ खालील गोष्टी शोधतील : गाळाच्या थरांची तपासणी आणि त्यांचे वय निश्चित करणे, त्यामध्ये कोणते सूक्ष्मजीव आहेत, याचा अभ्यास करणे, प्रदूषणाची पातळी मोजणे, चिखलात किती कार्बन गाडला गेला आहे, याचा हिशेब करणे.