पॅरिस : ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन (ग्रीनहाऊस गॅस इमिशन) मोठ्या प्रमाणात सुरू राहिले, तर 2300 पर्यंत अंटार्क्टिकाच्या निम्म्याहून अधिक (59 टक्के) बर्फाचे कडे कोसळू शकतात. या घटनेमुळे जगातील समुद्राची पातळी अपरिवर्तनीयपणे सुमारे 10 मीटरपर्यंत (32 फूट) वाढू शकते, ज्यामुळे अनेक जागतिक शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.
पॅरिस येथील सोर्बोन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधन आणि अभ्यासाचे निष्कर्ष ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. या निष्कर्षाप्रमाणे अंटार्क्टिकामध्ये 15 प्रमुख आणि अनेक लहान बर्फाचे कडे आहेत, ज्या अंटार्क्टिक बर्फाच्या चादरीचा (अंटार्क्टिक आइस शीट) समुद्रावर तरंगणारा भाग आहेत. बर्फाच्या कड्याच्या भूभागावरील बर्फाचा प्रवाह समुद्राकडे जाण्यापासून रोखून ठेवतात, ज्याला बट्रेसिंग म्हणतात. त्यामुळे त्या अंटार्क्टिकाभोवतीच्या सुरक्षिततेचा पट्टा (सेफ्टी बँड) म्हणून काम करतात. बर्फाचे हे कडे पातळ झाल्यास किंवा कोसळल्यास समुद्रामध्ये बर्फ विसर्जित होण्याची प्रक्रिया (आईस डिस्चार्ज) वेगाने वाढते, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढते.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार दोन मुख्य उत्सर्जन परिस्थिती (इमिशन सिनॅरिओ) विचारात घेण्यात आल्या. 2300 पर्यंतच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन निष्कर्ष काढण्यात आले आहेत. 2300 पयर्र्त उच्च उत्सर्जनाच्या (हाय इमिशन) स्थितीत जागतिक तापमानवाढ 12 अंश सेल्यिअसपर्यंत पोहोचले, तर 64 पैकी 38 (59 टक्के) बर्फाचे कडे कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत तब्बल दहा मीटर म्हणजे 32 फूटांनी वाढ होऊ शकते.
कमी उत्सर्जनाच्या स्थितीत जागतिक तापमान 2 अंश सेल्यिअसच्या खाली राखले गेले, तर 64 पैकी 1 कडा धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत समुद्राची पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते.
शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, 10 मीटरची वाढ 2300 पर्यंत अपेक्षित असली, तरी 2085 ते 2170 या दरम्यान बर्फाचे कडे मोठ्या प्रमाणात कोसळण्याच्या घटनांचा सर्वाधिक वेग नोंदवला जाईल. शास्त्रज्ञांच्या मते, हा अंदाज सर्वात पुराणमतवादी (कॉन्व्हरव्हेटिव्ह) बाजूचा आहे; पण प्रत्यक्ष कडे कोसळण्याची क्रिया यापेक्षा लवकर होण्याची शक्यता आहे. समुद्राची पातळी 32 फूट (10 मीटर) वाढली, तर जगातील अनेक किनारपट्टीवरील शहरे आणि प्रदेश पाण्याखाली जातील. त्यामध्ये यूकेमधील (युनायटेड किंगडम) हल, ग्लासगो, ब्रिस्टल, तसेच लंडनचा मोठा भाग पाण्याखाली जाईल. अमेरिकेतील फ्लोरिडाचा संपूर्ण किनारा, लुईझियाना आणि टेक्सासचा भाग तसेच ह्युस्टन, न्यू ऑर्लीन्स आणि मियामी तसेच आशिया खंडातील बांगला देशचा बराचसा भाग, शांघाय, हो ची मिन्ह सिटी आणि कराची यांनाही पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या निष्कर्षांवरून ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.