कॅनबेरा : जागतिक तापमानवाढीचा परिणाम ध्रुवीय प्रदेशांमधील बर्फाची चादर वितळण्यावर होत आहे. जगातील सर्वात थंड भाग म्हणजे दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्टिका. हा खंड पूर्वेपासून पश्चिमेकडे ट्रान्सांटार्क्टिक माऊंटन या पर्वतराजीने विभागलेला आहे. या पर्वतराजीतच माऊंट इरेबस हा महाकाय ज्वालामुखी आणि त्याच्या लाव्हा लेकचा समावेश होतो. मात्र अंटार्क्टिकामध्ये किमान शंभर सुप्त ज्वालामुखी असू शकतात, जे विशेषतः त्याच्या पश्चिम किनार्याकडील भागात लपलेले आहेत. काहींची शिखरे पृष्ठभागापासून वर आलेली असली तरी अनेक ज्वालामुखी हे अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या स्तराखाली अनेक किलोमीटर खोलीवर लपलेले असू शकतात. तापमानावाढीमुळे हा बर्फ वितळल्यास असे ज्वालामुखी उघडे पडून ते सक्रियही होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिकामधील बर्फाचा जाड स्तर वितळून त्याच्या पाण्यामुळे समुद्राचा जलस्तरही वाढण्याचा धोका आहे. बर्फ वितळण्याच्या क्रियेने खालील भागातील खडकांवरील दाबही कमी होत आहे. पृथ्वीवर अन्यत्र असे दिसून आले आहे की, बर्फ वितळल्यानंतर त्या खाली असलेले ज्वालामुखींमधील सक्रियता वाढली. कूनिन एटने बर्फाची चादर वितळल्यानंतर अंटार्क्टिकामधील दबलेल्या ज्वालामुखींवर कोणता परिणाम होईल याचा अभ्यास चार हजार कॉम्प्युटर सिम्युलेशन्समधून केला. त्यामधून असे दिसून आले की, बर्फ वितळत गेल्याने अशा ज्वालामुखींची संख्या व त्यांचा उद्रेक वाढत जाऊ शकतो. पृष्ठभागाखाली असणार्या मॅग्मा चेम्बर्सवरील बर्फाचा दाब अशा वितळल्याने कमी होतो. त्यामुळे दबलेला मॅग्मा फैलावतो. हे प्रसरण मॅग्मा चेंबर्सच्या भिंतींवरील दाब वाढवतो आणि त्यामुळे उद्रेक होऊ शकतो. काही मॅग्मा चेंबर्समध्ये भडकणारे वायू असू शकतात, जे सहसा मॅग्मामध्ये विरघळून गेलेले असतात. ज्यावेळी वरचा दाब कमी होतो आणि मॅग्मा थंड होतो, त्यावेळी हे वायू सोड्याच्या बाटलीतून वायू बाहेर येतो तसे बाहेर पडू शकतात. त्यामुळे मॅग्मा चेंबरमधील दाब आणखी वाढू शकतो. त्याची परिणती ज्वालामुखीच्या उद्रेकात होऊ शकते.