Antarctica Ice Gain | अंटार्क्टिकामध्ये २२ महिन्यांत ६९५ अब्ज टन बर्फ वाढला! 
विश्वसंचार

Antarctica Ice Gain | अंटार्क्टिकामध्ये २२ महिन्यांत ६९५ अब्ज टन बर्फ वाढला!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : वैज्ञानिक गेल्या अनेक दशकांपासून अंटार्क्टिका खंडातील बर्फ सातत्याने वितळण्याबद्दल चिंता व्यक्त करत आले आहेत. हिमनद्यांमधील (ग्लेशियर्स) बर्फ वितळून समुद्रात जात असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे आणि यासाठी हवामान बदल (क्लायमेट चेंज) हे मुख्य कारण मानले जाते; मात्र २०२१ ते २०२३ या कालावधीत या खंडात एक अत्यंत असामान्य बदल पाहायला मिळाला आहे. शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे की, अवघ्या २२ महिन्यांत येथील बर्फाचे प्रमाण घटण्याऐवजी चक्क ६९५ अब्ज टनांनी वाढले आहे. गेल्या दोन दशकांतील ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.

‘नेचर’ या प्रसिद्ध ब्रिटिश जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, बर्फातील ही असामान्य वाढ प्रामुख्याने पूर्व अंटार्क्टिकाच्या काही भागात झालेल्या प्रचंड हिमवृष्टीमुळे झाली आहे. संशोधकांना आढळले की, २००३ ते २०२४ दरम्यान खंडातील बर्फाचे सरासरी वार्षिक नुकसान सुमारे १४०.५ अब्ज टन इतके होते. परंतु, जुलै २०२१ ते एप्रिल २०२३ दरम्यान हे चित्र वेगाने बदलले. अभ्यासात या हिमवृष्टीचा संबंध उष्णकटिबंधीय महासागराच्या एका भागातील वाढत्या तापमानाशी जोडला गेला आहे, ज्याला ‘ट्रॉपिकल वॉर्म पूल’ म्हटले जाते. संशोधकांनी सांगितले की, सर्वात मोठे बदल पूर्व अंटार्क्टिका आणि अंटार्क्टिक द्वीपकल्पामध्ये दिसून आले, तर पश्चिम अंटार्क्टिकाच्या काही भागांत बर्फाचे नुकसान सुरूच होते.

सर्वात जास्त बर्फाचा साठा ‘क्वीन मॅरी लँड’ आणि ‘विल्क्स लँड’ भागात नोंदवला गेला, जिथे संशोधकांनी सुमारे ४७० अब्ज टनांची वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती आणि हवामान/हिमवृष्टीच्या डेटाची तुलना केल्यावर शास्त्रज्ञांना स्पष्ट झाले की, नेहमीपेक्षा जास्त झालेल्या हिमवृष्टीमुळेच ही वाढ झाली आहे. तथापि, ही वाढ झाली असली तरी, संशोधकांच्या मते या घटनेकडे अंटार्क्टिकामधील बर्फ वाढीचा दीर्घकालीन टप्पा म्हणून पाहिले जाऊ नये. या काळातही पश्चिम अंटार्क्टिकामध्ये बर्फ घटण्याची प्रक्रिया सुरूच होती, विशेषतः ज्या भागात आधीपासूनच मोठी घट नोंदवली जात आहे. अभ्यासात संशोधकांनी असा अंदाज लावला आहे की, क्वीन मॅरी लँड आणि विल्क्स लँड भागातील हिमवृष्टीतील या बदलामागे मानवनिर्मित घटकांचा सहभाग सुमारे ९ टक्के होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT