Waterless Survival Animals | ‘हा’ प्राणी कधीही पित नाही पाणी! Pudhari File Photo
विश्वसंचार

Waterless Survival Animals | ‘हा’ प्राणी कधीही पित नाही पाणी!

अरुण पाटील

न्यूयॉर्क : आपल्याला कमी पाणी पिणारा प्राणी म्हटलं की, ‘वाळवंटातील जहाज’ असलेला उंटच आठवतो. मात्र, उंट मिळेल त्यावेळी पाणी पित असतोच. एक प्राणी असा आहे, जो कधीही पाणी पित नाही! त्याचे नाव ‘कांगारू रॅट’. कांगारू रॅट हा एक लहान उंदीरवर्गीय प्राणी आहे, जो उत्तर अमेरिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो. तो त्याच्या दोन पायांवर उड्या मारण्याच्या वैशिष्ट्यामुळे ओळखला जातो, ज्यामुळे तो कांगारूसारखा दिसतो.

कांगारू रॅटला पाण्याची गरज नसते. कारण, तो त्याच्या शरीरातूनच पाण्याची निर्मिती करतो. कांगारू रॅट खाल्लेल्या बिया आणि वनस्पतींमधून पाण्याचा अंश मिळवतो. त्याच्या शरीरातील चयापचय क्रियेदरम्यान, कर्बोदकांपासून ऊर्जा तयार होताना पाण्याचे रेणू तयार होतात. या प्रक्रियेला चयापचय जल निर्मिती (metabolic water production) म्हणतात. कांगारू रॅटचे मूत्र अत्यंत कमी आणि खूप जास्त प्रमाणात घट्ट असते.

यामुळे शरीरातून पाण्याचा कमीत कमी अंश बाहेर पडतो. तसेच, त्याचा मलसुद्धा कोरडा असतो, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो. तो दिवसा त्याच्या बिळात राहतो. बिळातील हवा बाहेरील हवेपेक्षा थंड आणि ओलसर असते. यामुळे त्याच्या शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. तो रात्रीच बाहेर पडतो, जेव्हा हवामान थंड असते. त्याच्याकडे मोठे डोळे आणि कान असतात, जे त्याला रात्रीच्या वेळी शिकार शोधायला मदत करतात.

लांब शेपूट त्याला उड्या मारताना संतुलन राखायला मदत करते. त्याच्या गालात केसांच्या आतमध्ये पिशव्या असतात, ज्यांमध्ये तो खाद्यान्न साठवतो आणि बिळात घेऊन जातो. तो अतिशय उष्ण आणि कोरड्या वातावरणात राहण्यासाठी पूर्णपणे अनुकूलित आहे. वाळवंटात कमी पाणी उपलब्ध असल्यामुळे पाणी न पिण्याची त्याची क्षमता त्याच्या जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT