विश्वसंचार

…आणि मगरीने केला कुंपणावर चढण्याचा प्रयत्न!

Arun Patil

लखनौ : सोबतच्या फोटोत दिसणारे द़ृश्य हे एखाद्या चित्रपटामधील किंवा अगदी ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या वन्य प्राण्यांची संख्या अधिक असलेल्या देशातील नसून, भारतामधील आहे, असे सांगितल्यास तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मात्र हे सत्य आहे. हा फोटो उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमधील आहे. गंगा नदीच्या पात्रातून फूटपाथवर आलेली ही मगर पुन्हा पात्रात जाण्यासाठी कुंपणावर चढू लागली. अर्थातच, तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्याचा कुणीतरी व्हिडीओ बनवला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ वार्‍याच्या वेगाने व्हायरल झाला.

गंगा नदीच्या पात्रातून एक मगर चुकून रहदारीच्या नरौरा गंगाघाटजवळील रस्त्यावरील फूटपाथवर आली. आता ही मगर कशी आणि आणि कुठून आली, यासंदर्भातील नेमकी माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र आपण वाट चुकल्याचे लक्षात आल्यानंतर मगरीने पुन्हा नदीपात्रात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्ये काही फूट उंचीचे लोखंडी कुंपण होते. त्यामुळेच या 10 फुटांच्या मगरीने चक्क या कुंपणावर चढण्याचा प्रयत्न केला. शेपटीच्या आधाराने कुंपणावर चढण्याचा हा मगरीचा प्रयत्न पाहून आजूबाजूला असलेले लोक घाबरलेच.

या मगरीने कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि मगर पुन्हा फूटपाथवर पडली. वजन जास्त असल्याने आणि कुंपणाची उंची अधिक असल्याने मगरीला कुंपण ओलांडता आले नाही. पडल्यानंतर ही मगर पुढल्या बाजूला चालू लागली. या कुंपणाला ओलांडण्यासाठी इतर काही मार्ग आहे का, याचा ती शोध घेता पुढे चालू लागली. हा सारा प्रकार रस्त्यावरून जाणार्‍यांनी मोबाईल कॅमेरात कैद केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या मगरीला पुन्हा पाण्यात सोडण्यासाठी वन विभागाच्या अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले. या वन कर्मचार्‍यांनी मगरीला पकडून पुन्हा पाण्यात नेऊन सोडले.

SCROLL FOR NEXT